August 8, 2016

.

अघळ पघळ
चर्वित-चघळ
पृथ्वी त्रिभुज
माणसं तीन
ता-यांचा त्रिकोण
आणि वाढतच जाणारी पोकळी
पोकळीत भरलंय आदिम एकटेपण.
सिंदबाद- द सेलर व्हायला हवं
झेंडे रोवून, पाहून घ्यावं- जगातलं सगळं
जितकं काही- जिवंत, उन्मत्त, हिरवं
मग झेंडे उपटून निपचित तरंगावं निळ्या समुद्रात
एकटेपण आदिम आहे आणि अर्थहीनता खरी
म्हणूनच, भयाच्या गर्भातून स्त्रवायला हवी
भोगांची महत्वाकांशा!

September 30, 2015

.

तू विचारशील मी कोण म्हणून,
तेव्हा कदाचित सांगेन तुला,
नाव माझं,
एखादं छायाचित्र,
शिक्षण, पुस्तकं, कविता.


जोखशील मला, पडताळून बघशील,
मोजशील, मापशील,
येशील जवळ, किंवा नाकारशील.
बघशील, कोणते धातू बनवतात मला,
नि किती साचून राहिलेत..
अणु, रेणू माझ्यात.


पण कदाचित सांगणार नाही मी तुला..
कि धमन्यांमधून वाहते माझ्या,
ती हि एक नदी आहे.


सांगणार नाही कदाचित, ते हे..


कि उन्हाचं नुसतं स्पर्श करणं सुद्धा,
जाणवून देतं असतं मला सूर्यमालेचं अस्तित्व.


मला ओळख आहे रंगाची,
आणि कातडीतही आहेत माझ्या असंख्य रंगांच्या छटा


मला कळते भाषा, आणि अर्थहीन स्वर देखील
अर्थबोध होणं, ही माझी गरज नव्हतीच कधी.


सांगणार नाही कदाचित,
की आयुष्यातल्या प्रत्येक माणसाचा गंध ओळखून आहे मी,
प्रत्येक प्रहरात बदलत जाणारे, स्वतंत्र अस्तित्वांसारखे गंध.


सारखे गंध असणारी, दोन माणसं माहित आहेत मला..
जी विषुववृत्ताच्या दोन विरुद्ध बाजूना जगलीत आयुष्यभर, एकमेकांचे गंध सांभाळत.


समुद्र पाहिला, कि ओळख पटते मला त्याची पुन्हयांदा
शरीरातली संप्रेरके लाटा बनतात माझ्या, समुद्र पाहिला की.
कधीच सांगू शकणार नाही तुला,
की मला शारीरिक ओढ वाटते समुद्राची, पुरुषाइतकीच.


सांगणार नाही मी तुला,
कि गर्भात माया आहे माझ्या,
कि जीव लावता येतो मला
कुशीत घेऊन सांगता येतात परीकथा,
नि दुस-याच्या कुशीत शिरून ऐकत राहते मी श्वास.


कसं सांगणार मी,
हेच..
कि शिक्षण, नाव, कविता, पुस्तकं, भाषा, चित्र आणि अर्थ असलेलं सगळं,
या पलीकडेही आहे मला एक अस्तित्व,
अर्थहीन.


जे बदलणार नाही,
मी मानवी इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात जन्माला आले तरी.


आणि माझ्यातलं हेच तत्व ओढलं गेलंय तुझ्याकडे.


September 9, 2015

.


माणसांनी येऊ नये जवळ

डोळे मिटून, 

आकडेमोड करत, किंवा शंकेत झुरत.वल्नरेबिलीटी हा काही चॉईस नाहीये

माणसांनी यावं जवळ, 

आपण पाहिलेले सगळे सूर्यास्त घेऊन

अनवाईंड करावे शरीरातले सगळे तंतू

आणि दुस-या माणसांच्या तंतुंशी करून टाकावे सोल्डर

आर्बीट्ररीविस्कटलेल्या अंथरुणाची

करावी लागू नये सारवासारव,

इतकं खरं - यावं जवळ

माणसांनी


June 16, 2014

कधी, कुठे, कसा, का,
वेड्यासारखा जडतो जीव
जणू प्रसावणीला वारेमध्ये
मायेपोटी अडतो जीव

रात्रोरात्री काळोखात
रंग शोधू पाहतो जीव
डोळ्याखाली समुद्रात 
भर करत राहतो जीव

चाफ्याच्या फांदीवरती 
रुसून एकटा बसतो जीव
साद नाही, हाक नाही, मग
चाफ्याखालीच निजतो जीव


December 14, 2013

ऐल तटावर, पैल तटावर

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हासते, बोलते, कुढते, डोलते 
नजर तोलते
ऐल तटावर, पैल तटावर 

मनीच्या प्रश्नांची, बोचकी बांधते
वाळूच्या दाण्यांची, गणती मांडते 
थकते, तुटते, अखंड कसते 
दिवस मोजते 
ऐल तटावर, पैल तटावर 

ओलेत्या पानांचे, मार्दव चोखते
कोवळ्या जाणीवा, पोटाशी धरते
जोखते, जपते, लपून हसते
जगून बघते 
ऐल तटावर, पैल तटावर 

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हर्षदा विनया