November 27, 2008

मी अतिरेकी मी अतिरेकी

याला कविता म्हणावं की नाही माहीत नाही.. पण उत्कटपणॆ लिहीतेय..स्वानूभव आहे..लहान असताना केला दंगा जास्त
की, आजोबा नेहमी म्हणायचे,
" अतिरेकी कूठली, थारा नाही"

आई रागावून पाहायची,
मला गंमत वाटायची,
उड्या मारायचे जोराजोरात,
म्हणायचे मोठ्याने,
"मी अतिरेकी, मी अतिरेकी"

मग कूणी केला दंगा,
वा कूणी मस्ती..
माझं आपलं एकचं,
त्यांना म्हणायचे..
"तू अतिरेकी, ही अतिरेकी
हा अतिरेकी, तो अतिरेकी"
...
.
आता मी मोठी झालेय..

पण कालपासून मलाच भीती वाटतेय..
आता नाही म्हणावसं..
"मी अतिरेकी"
"नाही, नाहीच मी अतिरेकी"

मी नाही अतिरेकी....
मी खरंच नाहीये अतिरेकी..


हर्षदा....

November 25, 2008

ख-या अर्थाने मोठे...

मुलांबरोबर वावरताना, त्यांच्या एकेक लकबींचे निरीक्षण करताना अनेक विलक्षण गोष्टी लक्षात येतात. आपण ब-याचदा ज्या गोष्टींचा विचारही करत नाही ते त्याचा उहापोह करून मोकळे होतात...

एका सातवीतल्या मुलीला बालभारतीच्या पाठ्यपूस्तकातला एक पाठ शिकवत होते. त्याचा साधारण सारांश असा की, एक गरीब कुटूंबातली मूलगी खूप कष्ट करून IAS officer होते आणि तिच्याच वर्गातील एक मूलगा ( संजय ), तिच्याइतकाच बूद्धिमान असताना देखिल, फ़ार शिकू शकत नाही. तिच्या शाळेने आयोजित केलेल्या तिच्या सत्कार समारंभाला लक्षात येते की, तो त्याच शाळॆत आता शिपाई आहे.
या साधारण पाठावर मूलांना काही प्रश्न दिले आहेत, ज्यामूळे मूलांमध्ये UPSC च्या परीक्षांसंदर्भात आतापासूनच जागरूकता निर्माण व्हावी.
त्यातला एक प्रश्न : समजा, संजयने देखिल मेहनत केली असती तर तो IAS officer होऊ शकला असता का?
आता यावर मला "हो" एवढंच उत्तर अपेक्षित होते.. पण ऐका (वाचा) मी काय ऐकले..

" ताई ( मला संबोधून ), असे कसे म्हणता येइल, त्याने मेहनत केली असती तर लगेच झाला असता IAS ..आता त्या मूलीच्या घरी ती आईबाबांची एकूलती एक मूलगी असेल (असं पूस्तकात कूठेही दिलेलं नाही ), त्यामूळे तिला शिकवणं जमलं असेल आईबाबांना तिच्या ! समजा. संजयच्या घरी त्याची चारपाच भावंडे असतील आणि नेमका तो मोठा असेल तर त्याच्यावर भावंडांना मोठे करायची, बहीणी असतील तर त्यांची लग्न लावून द्यायची, ह्या जबाबदा-या असतील, मग तो काय करणार बिचारा..कसं परवडणार आईबाबांना त्याच्या?? "
मी तिला शेजारी कवेत घेण्यापलीकडे काहीही करू शकले नाही.
रोजच्या रोज हे असे अनेक अनूभव येत असतात,(सगळेच लिहीत राहणं शक्य नाही) आणि बोथट झालेल्या आपल्यापेक्षा ही चिमूरडी मूलंच खूप मोठी वाटायला लागतात.

एक अजून अनूभव जो मला एक व्यक्ती म्हणून बरंच काही देऊन गेला.

एक नवीन विद्यार्थी, पहीलाच दिवस ! "शेजारी बस" असं मी म्हटल्यावर शेळीच्या कोकरागत माझ्याकडे पाहणारे त्याचे भेदरलेले डॊळे...
सहज गप्पा मारता मारता "तूला गणित आवडतं का?' असं मी विचारल्यावर मानेनंच त्यानं नकार दिला. त्याचा हा प्रामाणिकपणा आणि निरागसता बघून, मी गमतीने म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवायला गेले तसे लगेच त्याने त्याची पाठ माझ्याकडे वळवली. मला कळेना, मग विचारलं तर म्हणाला, " माझी आधीची miss नाही आलं तर लगेच २/४ थोबाडीत मारायची, ते जोरात लागायचं मग तो मार चूकवण्यासाठी मी पाठ द्यायचो .. पाठीला कमी लागतं ना!"

ही निरागस पिल्लं निव्वळ त्यांच्यावरच्या दडपणाखाली पार पिचून जातात. त्यांचे प्रश्न, त्यांचे अवलोकन, आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरे ही परीक्षेच्या पाठ्यपूस्तकांपेक्षा वेगळी असतात.त्यांचे जगणे ते स्वतः फ़ूलवू पाहतात, अर्थात जर तसं करू दिले तर....

November 1, 2008

'ओंजळभर पाणी

ओंजळभर पाणी
खूप तहान लागलीये, हो ना?
ह्म्मं..मलाही, या वाळवंटात,
चल,आपणच खोदूया एक विहीर,
आपल्या दोघांसाठी,खोल-खोल..

मी माती सारते बाजूला थोडी,
मग तूही सार माती थोडी,
मग मी सारेन मोठाला दगड,
तूही कर तसंच,अगदी तसंच..

आलटून-पालटून, आळीपाळीने,
आपण सारत राहू एकेक सगळं
खूप खोल खोल जाण्यासाठी..

मग कूठेतरी लागेल ओलावा,
उत्साह दूणावेल आणि तहानही..
अचानक हाताला लागेल थोडंसं पाणी,
अगदी थोडं-थोडकंच हं...!!!

उडवून पाहीन मी ते पाणी,
तूझ्या नाक,गाल, ओठांवर,
शहारशील तू कदाचित, अचानक,
पण ओठ जरा जास्तच हपापतील..

तूझा उजवा हात दे अन माझा डावा घे,
बनवू आपण 'दोन' हातांची 'एक' ओंजळ,
दोन हातांची नि दोन जीवांची..एकच ओंजळ.

ओंजळीत घेउ ते थोडं-थोडकं पाणी,
येउ इतके जवळ की भिजून जाउ दोघंही !
त्या ओंजळभर पाण्यात, चिंब चिंब..
-------------------------------------------
---------------------------------
भिजून झाले आपले चिंब चिंब,'
की होतील कधीतरी श्वास थंड,
मग आवरून घेऊ...
बाजूला सारलेलं सगळं..
परत तसंच आळीपाळीने !!
एकेक दगड रचत राहू..

सगळं सावरून मग येऊ,
त्या 'खोलातून' 'जमिनीवर'.
एकमेकांकडे पाहून किंचित हसत!

रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी,
जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी'
निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर,
कदाचित वेगळ्या,हातातला हात सोडून,
एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता..

मी मात्र पाहीन वाट,
कधीतरी वळणं घेतील वाटा,
छेदतील एकमेकांना, 'चूकून.'.
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!!

हर्षदा .. (२७ ओक्टो. २००८)