December 27, 2008

स्त्रीत्व आणि पुरूषार्थ

लोकांना स्त्री श्रेष्ठ की पुरूष असा वाद नेहमीच ऐकायला मिळतो. एकदा असाच वाद ऐकताना पटकन बोलून गेले, " ज्या स्त्री किंवा पुरूषांना ख-या अर्थाने स्त्रीत्व किंवा पुरूषार्थ कळतो त्यांना ह्या वादांची गरज पडत नाही."
मी बोलून तर गेले होते, पण ते का बोलले होते ते माझं मलाही कळालं नाही.आणि स्वतःलाच विचारले, " बाई गं, असं अचानक काय बरळतेस?" आणि स्वतःच्या वाक्यांचा स्वतः मागोवा घ्यायला सुरूवात केली. माझ्या मते नक्की स्त्रीत्व आणि पुरूषार्थ म्हणजे काय? तेव्हा जे काही उमटले ते...थोडं, थोडकं, अर्धवट वाक्य तरीही कदाचित सगळंच...

स्त्रीत्व.....
जसे समोर चंद्र असला कि समूद्राच्या पाण्याला भरती येते, तशी प्रियकराचे डोळे रोखले असताना, गालावर रक्तीमा पसरून नकळत ओठांनी हसणं, म्हणजे स्त्रीत्व.....
रोजचं जगताना आपल्याला इतर माणसांपेक्षा "माणसा"बद्दल जास्त कळवळा आहे, ती माया, ममत्व जाणवणं, म्हणजे स्त्रीत्व...
स्तनपान देताना होणारा आनंद म्हणजे स्त्रीत्व....
'माझ्या पुरूषा'च्या डोक्यावर मी फ़क्त मायेचा हात फ़िरवल्यावर तो कोकराप्रमाणे पोटाशी बिलगेल, हे कळणं , म्हणजे स्त्रीत्व.....
आरशात पाहून केस विंचरताना नकळत आपल्या कमरेकडे पाहणे म्हणजे स्त्रीत्व.....

पुरूषार्थ...
आपलं मुल खाद्यांवर विसावलेलं असताना, ज्याला 'आई' व्हावंसं वाटतं तो खरा पुरूष...
'आपल्या स्त्री'च्या नजरेला नजर देताच ती बाकी सगळं विसरून, वेगाने स्वतःला माझ्यावर समर्पित करेल, हे कळणं, म्हणजे पुरूषार्थ...
या जगात माणसांच्या वेषात ९५% माकडे वावरत असतात, त्या माकडांना वाद, विवाद, लढा, भांडण हे सगळं न करता, स्वतःपासून वेगळं ठेवणं.. म्हणजे ख-या अर्थाने पुरूषार्थ.....

हर्षदा विनया...