January 24, 2009

तु हसतोस..

तू हसतोस,
खूप हसतोस..
वेड्यासारखा....
उधळलेल्या घोड्यासारखा...

एक हसायचा..
साधा सूर मिळाला तरी..
खेचतोस तो...
अगदी तारसप्तकात...
हसतोस.....बराच वेळ..
अगदी, डोळ्यात पाणी येऊन..
ठसका लागेपर्यंत... !!


पण, डोळ्यात पाणी काय,
फ़क्त ठसका लागल्यानेच येतं?
.
पण तरीही तू मात्र हसतोस...

डोळे काहीही बोलले तरी,
ओठ कितीही थरथरले तरी..
स्पर्श कितीही उमाळला तरी...
तू हसायचं बूवा काही सोडत नाहीस..
.. थरथरणा-या अधरांतून..
तूझे फ़सवे दात दाखवत !!

...
पण तू हस ...
असाच फ़सवत राहा.. स्वतःला..
डोळे बंद कर स्वतःचे....
आणि हस.. मोठ्यामोठ्याने...

अजून लाखो प्रकार शिकून घे..
हसण्याचे...
आजमावून बघ ते "जवळच्यांवर"..
बघ ते फ़सतात का?

ते फ़सले तर तू जिंकशील..
आणि नाहीच फ़सले..
तर मात्र.. "ते"च हरतील..
..
..तू झेपलास नाही म्हणून.. !!

हर्षदा.. २ जाने. ०९, १७.१३

January 23, 2009

तू हसतोस.... बाबासाठी.. !!

बाबा, तू नेहमीच का रे असा..
ओठ लांबवून हसतोस??
अलगद हसताना..
पापण्या तेवढ्या झूकवतोस खाली..
कूणाला डोळे दिसू नयेत,
म्हणून की काय??

बाबा...
आपली आई गेली ना..
तेव्हा तू कोप-यात बसलेलास..
मला फ़ार मज्जा येत होती रे..
इतकी सगळी माणसं बघून..
..
आपल्याकडे पार्टीला यायचे..
तेच सगळे होते ना तेव्हापण??

तेव्हा, मला येणारी मजा बघून..
मला पोटाशी घेऊन ..
तू असाच हसला होतास..
न जाणे, तेव्हा मात्र..
तूझ्या बंद पापण्यांतूनसूद्धा..
एक थेंब खाली ओझरलाच...
मला आपलं कळलंच नाही..
तूझे माझ्या डोक्यावरले हात..
असे का थरथरतायत??
....
बाबा.. तूझ्या या हसण्यावरंच..
.........मोठी झालेय रे मी !!

आजकाल,
मी फ़ार गोंधळ करते ना रे??
रोजच्याच खूरापती घेऊन येते..
..
चार भिंतींच्या पलीकडे मोकाट सूटते..
..
"मग धक्का मारतंच रे कूणीतरी"..
आणी मी चिडते...
पेटते.. आणि भिडते, नाक चढवून...

घरी आले की मात्र..
तूझ्या "थोड्या सूटलेल्या" पोटाला बिलगते..
तू मायेने हात फ़िरवून ..
तसाच हसतोस किंचित...
पण आजकाल पापण्या मिटत नाहीस..

मूद्दामंच दारं मोकळी सोडतोस..
तूझ्या मनाची

काळजी असते रे त्या डोळ्यांत..
"तू काळजी करतोस ना माझी?"

जाणूनबूजून मनाची कवाडं उघडतोस..
मी सावरावं म्हणून...

तसाच गालातल्या गालात हसत....
एका हाताने वेगळी करतोस मला..
तूझ्या शरीरापासून..

आता मी 'स्वतः' उडायला हवंय..
हेच सांगतोस ना?? मला लांब करून...
तसाच हसत..
गालातल्या गालात..
ओठ लांबवून..
पण पापण्या न लवता...

हर्षदा.. ८ जाने. ०९, १७.००

January 10, 2009

कृष्णा ...........

कृष्णा तूझी मीरा आता वेडावलीये...
रोजचीच धावपळ..
आणि रोजचीच ट्रेन..
गर्दीतले असंख्य स्पर्श..
...पण सगळॆ नकोसे !!
डोळ्यासमोरच्या असंख्य आकृत्या....
..
आणि त्यांच्या वेडगळ सावल्या..
सगळंच कसं मला फ़सवणारं...

या रोजच्या नव्या जगण्यातही..
रोज बदलत नाहीस तो तू..
तूझी आठवण..
आणि तू नसण्याची बोच...
हे शल्य जपावं आणि उधळावंही..
एकाच वेळी... क्षणी..

तसा तू अनोळखीच माझ्यासाठी..
......निराकार.....
चेहरा..माहीत नाही..
उंची, आकार, रंग, ढंग..
माहीत नाही....
पण तू "तू"च आहेस..
इतकंच कळतं !!!

किती सूखावले असते जर..
तूही असतास..याच गर्दीत..
कूठेतरी..
तूही शोधलं असतंस मला !!
विसावले असते क्षणीक का होइना??
पण सूखासाठीच !!

पण तू नाहीस...
तू नाहीसंच कूठे...
!!

हर्षदा.......

(अशा प्रत्येक मीरेसाठी जी कृष्णासाठी झूरता झूरता एकटीच लढते ..रोजचं का असेना, पण कठीण लढणं.. आणि तिच्या कृष्णासाठी... )
बस मध्ये शेजारी बसलेली एक मूलगी फ़ोनवर फ़ार लाडीगोडीने छान छान (साधारण दोन तास ) बोलत होती.. मनात येइल ते..हटटाने तक्रार करत होती.. असंख्य रंग, रस दिसले तीच्या बोलण्यात.. त्या गप्पांपूर्वी माझ्यासारखीच त्रासलेली ती गप्पांनंतर अचानक खूलली होती..मला कळलंच नाही..काय जादू झाली...पण जादू झाली खरी.. काहीतरी !!
तेव्हा सूचलं .........