February 24, 2009

शून्याचा काळ

.जेव्हा रात्री जास्त जागतात,
आणि पहाट लवकर उठते,
तेव्हा मध्येच निपचित पडतो,
तो फ़क्त "एका शून्याचा" काळ...

मग तो शून्य पांघरून घ्यायचा..
अंगा-खांद्यावर, डोक्यावर...
आत शिरायचे त्याच्या..
त्यालाच त्रिमीतीय बनवून..
आणि शिरलो त्या पोकळीत,
कि आपणंही निपचित पडायचं..
त्याच्यासारखंच.. निश्चिंत..शांत..
काळाला मागे टाकत....
...........
..............
पोकळीत शिरणं आणि
निपचित पडणं...
घेऊन जाते शून्याच्या ..
त्रिमीतीच्या पलीकडच्या..
चौथ्या मितीत...
काळाला जिथे मागे टाकून..
डोळे बंद करून..
शिरते त्या "मंद" अवस्थेत..
तेव्हा काळाची चौथी मितीपण हरते.
. माझ्या निगरगट्टपणापूढे..
शांत, निंवात, बंद डोळे....
आणि ती तंद्री मोडण्यासाठी..
आसूसलेले माझ्या मनातले विचार..
ही अजून पाचवी मिती....
नालायकशी.. चौथीवर स्वार होऊ पाहणारी...
पण छे !! आता शक्य नाही..
शून्य अजून लहान लहान होतंय..
पाय आता पोटाशी घ्यावे लागतायंत,
मान खाली वाकवावी लागतेय..
पाठीला बाक आणून एक गोल बनलायं..
माझाचं.. शून्यासारखा...
आता शून्य बिंदू होऊ पाहतोय...
आणि मग पूढे.. "nothing" होऊ पाहतोय..
छे !! आता मागे वळणे नाही..
आता ते शक्यंच नाही..

हर्षदा विनया.(२४ फ़ेब्रू. ०९)

February 23, 2009

सूख-सूख

देहाला हवेसे,
सूखी कवडसे,
तरी मागतसे,
सुख-सुख !

सुखाला म्हणावे,
कूठून व्याख्यावे,
अनादि अंतिम,
सूख-सूख !

व्याख्या कठीणंच,
संदर्भ देहाचा,
मोजणे अशक्य,
सूख-सूख !

कसे समजावे,
जेव्हा उमजावे,
देहा विसरावे,
सूख-सूख !

देहाचा वापर,
माध्यम केवळ,
कळून उरावे,
सूख-सूख !

भोग भोगायचे,
इतूके कामाचे,
आत्म्यास पूजावे,
सूख-सूख !

अंतरी वसावे,
उच्च पूजनिय,
दाविले पल्याड,
सूख-सूख !

बंद डोळ्यांमाजी,
दिसला प्रकाश,
जाणावे तेचहे,
सूख-सूख !

बाजूला विरळ,
हवाही चपळ,
डोळियाचे पाणी,
सूख-सूख !

आभाळीचा सूर्य,
तांबडे आकाश,
शहारले अंग,
सूख-सूख !

मंदिराच्या पायी,
लाविली तंद्रीही,
शूद्ध हरपली,
सूख-सूख !

असेही सूखात,
भोगियले आज,
वसला मनात,
सूख-सूख !!

नास्तिक मनात,
फ़ूलवल्या आशा,
प्रिय परमेशा,
सूख-सूख !!

हर्षदा..
ह्म्म्म... सूख- सूख

February 19, 2009

"सखा"

कधीतरी "सखा" या शब्दाने भुरळ पाडली त्यातंच चैताली आहेर (उर्फ़ चैताली ताई) यांची "सखा-सर्वसमावेशक असा" ही कविता वाचनात आली..
ती अशी :

सगळ्यांना मित्रं-मैत्रिणी असतात .... मलाही आहेत...
पण तु माझा "सखा" आहेस....
त्या निळ्या,मिश्किल कृष्णासारखा..... अथांग.....
काहितरी शोधत होते.... युगोनयुगे....
ते तुझ्याकडे आहे... अगदी शुद्ध स्वरुपात.....
फुलांवरून हात फिरवत असताना... आई गं!
टचकन काटा रुतला मला... तळमळले....मनापासून कळवळले!
शोधला काटा... पण बहुतेक फुलंच टोचलं असेल मला.....
तु बघत होतास स्थित्यंतरं ...... स्थितप्रज्ञासारखा!
त्या बेसावध क्षणी.... मी भान विसरले,
तुही माझा हात धरलास.... किंबहुना मला तरी तसे वाटले....
आणि आपण निघालो त्या क्षितिजाकडे...
केव्हाच पोहोचलो असतो ..... अल्याड काय अन् पल्याड काय!
पन तु माझा हात सोडलास ......!!!!! म्हणालास.....
"चल जा! मार भरारी....मी आहे इथेच..."
मी चमकून बघितले तुझ्याकडे आणि क्षणात मळभ दुर झाले.....
मी पिसाहून हलकी होउन उडाले...
कुठेही असेन मी आकाशात....
खात्री आहे मला.... माझ्याकडे त्याच अनिमिष नेत्रांनी बघत असशील तु...
... नितळतेने भरलेल्या.....
म्हणुनच तु माझा "सखा" आहेस..... सर्वसमावेशक असा!!!


------ चैताली.


------ चैताली आहेर..

ह्म्म्मं.. सखा.. कोण असतो सखा.. मित्र असतो? प्रियकर असतो? कि त्याही पलीकडंचा असतो कूणीतरी?
आणि एक विचारचक्रच सूरू झालं..
चैताली ताईने उत्तमप्रकारे व्याख्या केली आहे..
>>"तु बघत होतास स्थित्यंतरं ...... स्थितप्रज्ञासारखा!
>>पण तु माझा हात सोडलास ......!!!!! म्हणालास.....
"चल जा! मार भरारी....मी आहे इथेच..."
तिच्या या ओळी बरंच सांगून जातात.
सखा हा निव्वळ मित्र नाही, तो प्रियकरही नाही कारण प्रियकराबद्दल असणारी सहवासाची, शरीराची ओढ त्याच्याबद्दल वाटत नाही.
सखा.. हा सूर्यासारखा.. स्वतः तळपून प्रकाश देत राहणारा, दूर राहून उगवण्यापासून मावळेपर्यंत ’आपल्याकडॆच पाहतोय कि काय?’असे भासवणारा.. तो सखा !!
सखा क्रूष्णासारखा.. युद्धात सहभागी न होता, अर्जूनाला गीता सांगणारा..त्याच्या रथाचा सारथी..मार्गदर्शक..युद्धाची सुत्र हलवणारा..पण तरीही नामानिराळा राहणारा.. तो सखा !!
आयूष्यातला सखा ही असाच हवा.. सगळी जगण्याची लढाई दूरवरून पाहणारा..पण स्थितप्रज्ञासारखा (हे महत्वाचे) !!
पण सतत भासवणारा कि "मी आहे"
लढाईत सहभागी न होता सुद्धा "तू लढ,घे भरारी.. मी आहे" ह्या एका वाक्याने हजारों हत्तींचे बळ देणारा ..तो सखा.. !!
सखा स्वतःमध्येच वेगळा आहे.तो कूणातही सापडू शकतो, एखाद्या मित्रात,मैत्रीणीत,आईत,बाबात,प्रियकरात,प्रेयसीत...कूणातही..
पण जर तो प्रियकरातच असेल तर त्यासारखं सुख नाही !! काय म्हणतात ते हिंदीत "सोने पे सूहागा!" [:)]

हर्षदा...
१९ फ़ेब्रू. ’०९

February 18, 2009

तूही ये असाच.... कधीतरी

तूही ये असाच..कधीतरी...
तू पाठवलेला वारा,
काल कानात गुंजी घालून,
मानेखाली गूदगूल्या करून,
अलगद निघून गेला..
निरोप न घेता...
ए, एकदा तूही ये असाच..

बघ ना ! तो वरचा ढग,
कसं आभाळ व्यापून राहीलाय..
जसं..तू व्यापलंस माझं आभाळ..
एकटाच आला आणि..
गूपचूप बरसून गेला माझ्या अंगणात..
ए, एकदा तूही ये असाच...कधीतरी..

कधीतरी माझ्या खिडकीजवळचा पडदा..
वा-याने फ़ार उडत असतो..
जवळ असले मी की,
मुद्दाम फ़िरतो माझ्या ओठांवर..
ए..तूही फ़िरून बघ ..
एकदा असाच..कधीतरी....

खळाळती नदी बन कधीतरी..
वाहून बघ..
आत बाहेर माझ्यातून...
भिजव मला.. आणि
चिंब हो तूही...
बघ.. ये एकदा असाच....
निरोप न देता..
आगंतूकासारखा....

पण ये.. ये ..कधीतरी..

हर्षदा

February 17, 2009

रात्र...

रात्र...........
तू अशीच पसरवत जात होतीस,
स्वतःला..माझ्या रोमारोमावर...
तूझी काळी छाया झाकाळत होती,
माझं मन.. माझ्याही नकळत..

शेजारी निद्राधीन असलेल्या
माझ्या मालकालाही आलीस ओलांडून..
त्याला कशी जाणवली नाही,
तूझी अनामिक.. भयंकर चाहूल??

पण मी भेदरले होते..
मी खरंच भेदरलेच होते..

शिरले त्याचे कूशीत..
त्याचे प्रचंड बाहू आवळून घेतले..
स्वतःभोवती.... !!
रूतवून टाकला माझा चेहरा..
त्याच्या छातीवर !!
...पण.. पण..सारं व्यर्थ !!

माझ्या धडधडणा-या छातीतून,
... भिजलेल्या अंगातून,
कपाळावरून ओघळणा-या घामातून,
थरथरणा-या देहातून,
नजरही वर उचलता येत नाही..
इतक्या घाबरलेल्या माझ्या मनातून..


जाणवत राहीलीस तू....
अजून अजून घाबरवत राहीलीस..

आणि मी घाबरत राहीले तूला..
त्याच्या कूशीत असतानाही..
कारण..
तो असूनही एकटी होते मी..
आणि तू सोबतीला..
एकटेपणाची जाणीव करून द्यायला...

हर्षदा (जाने.०९)
( संतोष (कवितेतला) यांची रात्र कविता वाचून सूचलेली कविता )