February 17, 2009

रात्र...

रात्र...........
तू अशीच पसरवत जात होतीस,
स्वतःला..माझ्या रोमारोमावर...
तूझी काळी छाया झाकाळत होती,
माझं मन.. माझ्याही नकळत..

शेजारी निद्राधीन असलेल्या
माझ्या मालकालाही आलीस ओलांडून..
त्याला कशी जाणवली नाही,
तूझी अनामिक.. भयंकर चाहूल??

पण मी भेदरले होते..
मी खरंच भेदरलेच होते..

शिरले त्याचे कूशीत..
त्याचे प्रचंड बाहू आवळून घेतले..
स्वतःभोवती.... !!
रूतवून टाकला माझा चेहरा..
त्याच्या छातीवर !!
...पण.. पण..सारं व्यर्थ !!

माझ्या धडधडणा-या छातीतून,
... भिजलेल्या अंगातून,
कपाळावरून ओघळणा-या घामातून,
थरथरणा-या देहातून,
नजरही वर उचलता येत नाही..
इतक्या घाबरलेल्या माझ्या मनातून..


जाणवत राहीलीस तू....
अजून अजून घाबरवत राहीलीस..

आणि मी घाबरत राहीले तूला..
त्याच्या कूशीत असतानाही..
कारण..
तो असूनही एकटी होते मी..
आणि तू सोबतीला..
एकटेपणाची जाणीव करून द्यायला...

हर्षदा (जाने.०९)
( संतोष (कवितेतला) यांची रात्र कविता वाचून सूचलेली कविता )

1 comment:

Innocent Warrior said...

Sahich!!!

Jam awadali!!!

-abhi