March 26, 2009

थेंब

ट्प ..
मंदसा नादावला
आणि
एक थेंब बरसला..
कपाळाच्या मध्यभागी...
झाली जाणीव ओली..

सरळ पाझरत आला..
नाकाच्या टोकावर..
मीच त्याला सावरून,
धरल्यासारखा...
शांत.. संथ..

दूसरा थेंब ...
गालावर ओघळला..
गूदगूल्या करीत..
पूरेपूर जाणवला..
पळत आला खाली,
भिजवली हनूवटी,
जशी स्पर्शीली ..
मायेने कूणीतरी...

तिसरा थेंब हातावर..
थोडासा जोरात..
मोती बरसावा तसा...
मी पटकन ओंजळ बनवली,
सारे मोती साचले तळहाती...

मग पिऊन घेतला थेंब थेंब,
आणि ओठांनाही झाला स्पर्श..
कूणाचीतरी,
बोटं फ़िरल्यागत...

असा एकेक थेंब बरसत राहिला..
भिजवत राहीला...
ट्प ट्प नादावत राहिला..
आणि मी भिजल्यावर,
मीही पाझरले.. डोळ्यांतून..
काही थेंब माझ्यातही पाझरले..
चेह-यावरच्या,
त्या थेंबांशी एकरूप होत...
सारे थेंब थेंब भरून राहीले माझ्यात...
आता.. मलाही बरसायचंय..
कूणावरतरी..
बरसायचंय मलाही..
बरसायचंय..

हर्षदा विनया.
(मार्च २००९)

March 3, 2009

माझं मन.. !!

"mind manifests itself as
the stream of consciousness"
पूस्तकातली व्याख्या घोकून,
जेव्हा पूस्तक बाजूला ठेवलं..
आणि खिडकीतून बाहेर पाहीलं..
चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसलं..
एकेक चांदणी गलोलीने पाडावी वाटली..
आणि कळलं पुस्तकाच्या व्याख्येच्याही..
पलीकडॆ आहे वेडं मन !!

कधीतरी वाटतं, मोठ्याश्या oysterमध्ये,
वाळूसारखे अलगद शिरलो..
तर आपला पण मोती होईल?
कधी कधी वाटतं..
जगातली सगळी फ़ुलं,
पांघरली अंगावर तर...
मी सुगंध मिळवेन कि ते?
हसरं हसरं फ़ूलपाखरू उडताना पाहीलं,
कि पाठ चाचपून पाहाविशी वाटते..
चूकून एखादा तरी पंख फ़ूटला असेल तर
आणि कळतं,
पूस्तकाच्या व्याख्येपलीकडचं माझं मन !!
एकटं असलं तरी सोबत करतं,
जीवनाच्या असंख्य आयामांतून फ़िरवते..
देह स्थिरावलेला असला तरी..,
कधी बाबाच्या मांडीवर डोके ठेवून येतं,
कधी प्रियकरच्या गालाला गाल घासून येतं,
कधी अवकाशातून हूंडारत राहतं....
आकाशगंगा सोडून उगा देवया्नीच्या वाटेला जातं..
आणि कळतं, व्याख्येपलीकडंचं मन !!

हसता हसता डोळे ओलवून टाकतं,
पडता पडताच "उठ" म्हणून सांगतं..
स्वतः हरवते पण मला सावरतं..
असं व्याख्येपलीकडचं मन !!

या गर्दीत वास लागल्यासरखंच..
"माझ्या" माणसांकडॆ ओढ घेतं..
मुक्ततेच्या व्याख्येत जाणीवांना बसवते..
आणि मजेमजेतंच अद्वैत शिकवतं...
सगळं so called "माणूसपण" बाजूला ठेऊन,
"माणूस" नावाचा प्राणी बनून जगायला शिकवतं..
जगण्यातला रस पिताना..
सगळॆ आडपडदे दूर टाकायला लावतं..
तेव्हा कळतं, व्याख्येपलीकडंच माझं मन!!

वाकूल्या दाखवत स्वतःच,
कोडे बनून उभे राहते....
"चल बघू सोडव मला"...
आणि कळता कळता हातून निसटतं..
असं व्याख्येपलीकडंच माझं मन !!

हर्षदा विनया...