May 24, 2009

तुझ्यासाठी..

यापूढे, कधी मुठी आवळल्याच,
तर न चुकता,
कोरून ठेव,
एका स्त्रीचे चित्र मनगटावर,
असंख्य माद्यांच्या गदारोळातंही,
स्त्रीत्व जपणा-या ’स्त्री’ चं चित्र..
"तुझ्या" स्त्री चं....

कधी रागात,
दात-ओठ खाताना,
सापडलास स्वतःला,
चुकून..
तर बघ तिचे गोलाकार नाजूक स्तन,
स्वतःच्याच मनगटावरचे...

आणि सांग स्वतःला, "मी शांत झालोय"

कधी आवेशात,
वावटळीसारखा भिरभिरताना,
सापडलास स्वतःला,
तेही चुकूनंच..
तर बघ तिचं मनगटावरचं अस्तित्त्व..
आवळून धर तिला तुझ्या बाहूत,
जाणवेल तुला,
तुलाच धरून ठेवलंय तिनं,
तुला आणि तुझ्यातल्या वावटळीलाही....

कधी उद्वेगात,
दोन हातात तोंड लपवून,
रडताना सापडलास स्वतःला..
चुकून.. हो चुकूनंच...
कि सारे अश्रू सांडून दे..
मनगटावर...

नाहीशी होईल ’ती’..
आणि मुठीही सुटतील..
आवळलेल्या....

तुझ्या ओंजळीत,
तुझेच अश्रू बनून..
वाहेल ती.. तुझी ’स्त्री’..

हर्षदा विनया..