May 24, 2009

तुझ्यासाठी..

यापूढे, कधी मुठी आवळल्याच,
तर न चुकता,
कोरून ठेव,
एका स्त्रीचे चित्र मनगटावर,
असंख्य माद्यांच्या गदारोळातंही,
स्त्रीत्व जपणा-या ’स्त्री’ चं चित्र..
"तुझ्या" स्त्री चं....

कधी रागात,
दात-ओठ खाताना,
सापडलास स्वतःला,
चुकून..
तर बघ तिचे गोलाकार नाजूक स्तन,
स्वतःच्याच मनगटावरचे...

आणि सांग स्वतःला, "मी शांत झालोय"

कधी आवेशात,
वावटळीसारखा भिरभिरताना,
सापडलास स्वतःला,
तेही चुकूनंच..
तर बघ तिचं मनगटावरचं अस्तित्त्व..
आवळून धर तिला तुझ्या बाहूत,
जाणवेल तुला,
तुलाच धरून ठेवलंय तिनं,
तुला आणि तुझ्यातल्या वावटळीलाही....

कधी उद्वेगात,
दोन हातात तोंड लपवून,
रडताना सापडलास स्वतःला..
चुकून.. हो चुकूनंच...
कि सारे अश्रू सांडून दे..
मनगटावर...

नाहीशी होईल ’ती’..
आणि मुठीही सुटतील..
आवळलेल्या....

तुझ्या ओंजळीत,
तुझेच अश्रू बनून..
वाहेल ती.. तुझी ’स्त्री’..

हर्षदा विनया..

5 comments:

Mrs. Asha Joglekar said...

आणि मुठीही सुटतील..
आवळलेल्या....

तुझ्या ओंजळीत,
तुझेच अश्रू बनून..
वाहेल ती.. तुझी ’स्त्री’..सुरेख.

Dipali said...

हर्षदा,
छान लिहिलं आहे...सुंदर...

Archetypes India said...

जुनीच दारू, नवीन बाटली. "तेच ते अन् तेच ते, तीच नारी तोच पलंग." मीरेला वीष प्यायला लागले. सीतेला अग्नीपरिक्षा द्यावी लागली. द्रौपदीची साडी फेडली. अहिल्येला दगड व्हावे लागले. रोज नवे देशी सिनेमा आणि टीवी वर असे ड्रामा होतात.


हे सारे साऱ्या इंडियात होते की नाही माहित नाही. पण समाजाला याचे काही उत्तर सापडले का? पण आदीवासी समाजात नक्कीच होत नाही.

आणी याचे उत्तर संस्थापित चौकटीत राहून कधीच सापडणार नाही. गवसेल ती फक्त "मलमपट्टि". तेही करून होते काय? तो रडेल आणि ती वाहून जाईल... लुडकेल किंवा टपकेल म्हणा ना. "तुझ्या ओंजळीत, तुझेच अश्रू बनून.. वाहेल ती.. तुझी ’स्त्री’.. "

कधी सवडीने मी आत्ताच पूर्ण केलेली मालिका "Lowest Common Factor " -- विशेष करून सातवा लेख "Propagation" - "प्रजनन" - वाचा. आणि जरुर तुमचे विचार कळवा. धन्यवाद.

लक्ष्मीकांत said...

जबरदस्त आहे.... मला तुझं आतापर्यंतचं सर्वात आवडलेलं लिखाण !!!

Anonymous said...

Chhaan vatla, ki jagat ya goshtinna samajnaare ani mukhyataha tyavar vyakt karnaare purush ahet