June 2, 2009

तिचं सटवीचं वाण

बाई नाजूक गोजिरी, चवळीची शेंग जशी,
भर भरली अंगानं, बघ मोहरते कशी..

अशी काय ती दिवाणी, सांजवेळी फ़िरकली,
नदीकाठी तळ्याकाठी, तिची पावलं रूतली..

बाई फ़िरे रानोमाळी, जसं पिसाटलेलं वारं,
तीत नादला तो वेग, मानली वा-यानीही हार..

खुळी डोंगर-कपारी, एकलीच गाणी गाते,
फ़ेर धरते हसून, गाभूळली चिंच खाते..

बाई वेडी गं वडी गं, वर डोळे वटारते,
मग घाबरून तिला, वर वीज कडाडते..

अनवाणी पायांनी, सारं रान धुंडाळते,
काटा बोचला तिला, कि आभाळ पाझरते...

बाई वा-याची वा-याची, बाई तशी गं नाठाळ,
अंगाला टोचती नजरा, तरी नाचे बांधूनिया चाळ...

बाया बापड्या बघती, घेऊन नजरेत घाण,
तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण..

तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण...

हर्षदा विनया..

update : बाई म्हणली कि तिच्या चौकटी नकळतंच आखून दिल्या जातात आणि त्या तशाच्या तश्या accept पण केल्या जातात..
मोकळ्या रानात फ़िरणं, काम नसताना घराबाहेर राहणं हे दर दूरंच..पण सहज म्हणून संध्याकाळी फ़ेरफ़टका मारायचं असं तिला वाटलं तरी हजारो माणसं चालत असलेल्या रस्त्यात सुद्धा कोणीतरी सोबत (ओळखीचं) हवं असतं तिला.. कारण तिला तसचं शिकवलेलं असतं....
अशा परिस्थितीमध्ये, एखादी मोकळं राहू पाहणारी मग सटवी ठरते...
माणुस म्हणून सुद्धा साधा हवा असलेला मोकळेपणा सहजासहजी मिळत नाही..
अजूनही गावागावांमध्ये, अफ़गाण, इराण, इराक, बांग्लादेश, भारत (हो आपण सुद्धा) अशा देशांमध्ये आजही बाईचा मोकळेपणा आणि तिचं चरित्र याचा सहज संबंध लावला जातो...

मोकळं फ़िरू पाहणं, निसर्ग अनूभवून पाहणं, स्वतःला आत्ममग्न ठेवणं, या तिच्या गरजा असूच शकत नाहित असं वाटतं या जगात सगळ्यांना... त्यात एखादी "नाठाळ" निघालीच तर तश्याच कडक आणि अश्लील शब्दांमध्ये तिची विभत्सना होते आणि प्रत्येक स्त्री त्या शब्दांना "घाबरते"...
....
म्हणून जर घरात बंदिस्त राहणा-या, खिडकीतून आलेली हवा पुरेशी असणा-या बाईकडे जर सतीचं वाण असेल..तर मी जिला रंगवू पाहतेय अशा बाईकडे सटवीचंच असायला हवं नाही का?
...
या बद्दल तस्लिमा नसरीन यांच्या लेखनमालेतील (नष्ट मेयेर नष्ट गद्य) पहीलाच लेख वाचण्याजोगा आहे..

हर्षदा

ता.क. नष्ट म्हणजे वाया गेलेली.. नष्ट मेयेर नष्ट गद्य म्हणजे नाठाळ बाईचे नाठाळ लिखाण..
तस्लिमा स्वतःला नाठाळ समजते.

10 comments:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

डोळ्यांसमोर उभी राहते एक मन्स्विनी. आणि तिचं एक चित्र. पण असं चित्र की जे हलतं आहे, ज्याला विचार भावना आहेत, ज्याची तीव्रता सर्रक‌न मनात घुसते. शब्दाशब्दाला क्षणाक्षणाला अंगावर चर्रकन काटे उभे राहतात.

Innocent Warrior said...

Ti talam aganichi paat,
dinraat jalavi mand
ti mukta bandh swachand
ranat jhara beband

Mala ekada tari ya kavitetil mulila bhetayache aahe.

khupach chan lihile aahe.

Innocent Warrior said...

update is avadala

Remigius de Souza said...

तुम्ही या कवितेत कमालीचा रस परिपोष साधला आहे असं मला वाटते. सती असो की गरती असो की सटवी, आयुष्यभर त्यांचे भोग उणे पडत नाहीत. कविता वाचल्यावर मला पण वाटले, काय ही स्त्रीची अवस्था!

सटवी हा शब्द शिवी म्हणून वापरतात, बहुधा बायका. काही समाजात बाळंतपणानंतर विशिष्ट दिवशी सटवी येईल म्हणून रात्र जागवतात. वर्षानुवर्षे मैलोगनीक प्रवास केला -- अनेक शहरात आणि खेड्यात. पण खारीखुरी सटवी कधी भेटली नाही, की दिसली नाही, की ऐकिवात आली नाही. कदेही कधी सिनेमात वगैरे दाखवतात.

सटवी ही केवळ कल्पना किंवा संकल्पना असावी. मात्र आधुनिक जमान्यात कोण सटवी कधी आकर्षक नट्टापट्टा पेहराव करून येईल आणि कुणाला नागवून जाईल याचा नेम नाही. जसे व्हाईट कोलरवाले लफंगे असतात तसे.

तुम्ही लिहिलेले अत्त्याचार सहसा सुसंस्कृत समाजात होतात. आदीवासी समाजात होत नाहीत. विलायतेत, मध्ययुगात, म्हणे तीस हजार स्त्रीयांचे किरिस्ताव (christian ) धर्ममार्तंडानी शिरकाण केले. त्यांचा अपराध काय? तर त्याना अतींद्रिय श्रवण आणि दृष्टि प्राप्त झालेली होती. त्याना चेटकिणी ठरवून जाहीर रित्या मारले गेले. आणि एक विद्या नष्ट झाली.

समाजाला ही असली मुल्ये कुणा कडून मिळाली? माझे नाव जरी फिरंगी असले तरी मी राहिलो साधा देशी माणूस. "कलेसाठी कला" हे विलायती तत्त्व मी काही मानत नाही. मायावी वास्तवता (virtual reality ) ही शेवटी मायावीच -- सटवीच -- राहते, साहित्य असो की विज्ञान की तंत्रज्ञान की धर्मज्ञान, वास्तवतेत कसा फरक पडणार?

आशा जोगळेकर said...

असं सटवीचं वाण घेऊन स्वच्छंद जगायला कुठल्या ही बाईला आवडेल. सटवी म्हणजे षष्ठी । पण ती आपली दुखद बाजू लिहिते म्हणे. तिनी फार कांही वाईट लिहू नये म्हणूनजन्मा नंतर पंचमी आणि षष्ठी ची ही पूजा करतात.

Harshada Vinaya said...

sarvanche aabhar.. satatyane vachanyasathi aani aavarjun feedback denyasathi...

चैताली आहेर. said...

बाया बापड्या बघती, घेऊन नजरेत घाण,
तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण..

तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण...


हर्षा....चिमणे....कसं गं आभाळात विहरता-विहरता एवढं खोल लिहितेस.....

लिहीत रहा....म्हणजे मला विचार करायला मिळतो..!!

Maithili said...

Khoop chhaan aahe kavita. He vaachoon ekdam ek aathavan aali. maage ekada aamchya eka olkhichya aaji mhanalya hotya ki tyanchya lahanpani sandhyakaalachya veli khidkit basane sudhha gunha hota. 7 varshachya niragas muline keval hya 'gunhyasathi' maar khalla hota mhane. aani pudhe mhanalya hotya ki tumhi aajkaalchya pori khoop nashibvaan aahat.
Kavita vaachatana ha swarthi vichar aala manaat ki...kharech mi barich nashibwan aahe.........

A Priori of My Life ! said...

basss...kay lihu...in the last three years i hvant seen this kinda poetry...hats off...kahi divasanpurvich grace vachala hota...aani aaj tu !!!!

विनायकी said...

.