March 26, 2011

Mr. के

दोन वर्षांपूर्वी एका लहानश्या जगात शिरले. जिथे जगणे म्हणजे पळणे नव्हते, खरं तर इथे जगणं म्हणजे एक अनपेक्षित आणि नकोशी स्थिरता होती. या जगात पाऊल टाकल्या टाकल्या अनेक अनेक तोंडानी माझ्याजवळ येऊन या जगाचे नियम शिकवले..झाडा-फूला-पक्ष्या बद्दल नाही तर माणसाबद्दल ...
खूप काही सांगितले गेले...
सगळ्यात कुरूप चित्र ज्यांचे रंगले ते म्हणजे के. हो आपण 'के'चा म्हणू त्यांना.
1. के खूप वाईट आणि अत्यंत फाजील बुद्धीचे आहेत.
२. के उगाच मुलांवर हवेतसे टोमणे मारतात.
३. के उगाचाच मुलींकडे फार लक्ष देतात.
४. के इथल्या राजकारणातले सर्वात मुरलेले आणि त्यायोगे मुलांचे वाटोळे करणारे खिलाडी.
..हे सगळे काय कमी होते तर केंच्या वृत्तीवर टिपण्या देणारे लिखित पुरावे आम्हाला एका सहलीत केंनीच दाखवले.
.
अगदी साधू बनून सगळ्याकडे दुर्लक्ष दिले तरी मुद्दा क्रमांक तीन माझ्या बुद्धीला विसरता येईना..

के एक बघूनच क्षणभर गंमत वाटेल असे व्यक्तिमत्व. कायम काहीतरी बघून हसत आहेत असे डोळे..समोरून असे चालत येणार कि जणू आपल्या डोक्यात एक टपली मारायला येताहेत.
टाळता न येणा-या काही चर्चांमध्ये कें ची मते नेहमीच पटल्यासारखी वाटायची. 'बरंच कळतं तर ह्या माणसाला!' असं वाटतं ना वाटत तोच, 'तरीही असं वाह्यात का वागावं माणसानं?' असं माझं मन माझ्या मेंदूशी चूगली करायचे. केंशी तसाही मी स्वत:हून कधी बोलायचा प्रयत्न केला नाही अर्थात मनात अढीच धरून राहिले होते.
वाचानालयातल्या प्रत्येक आवडणा-या पुस्तकावर आधीचा वाचक म्हणून केंच नाव सापडायचं . हळूहळू मनातल्या अढीवर या अनुभवाने कडी केली :)
वाटलं एकदा जाऊन बोलावं यांच्याशी, विशेषत: मराठी साहित्याबद्दल.
हळूहळू केंशी स्मितहास्याची आदानप्रदान व्हायला लागली. कधीतरी वापरून बुळबुळीत झालेले इंग्रजीतले अभिवादानपर शब्द. केंशी मोकळेपणे बोलणा-या मित्रमैत्रीणींच्या घोळक्यात असताना कधीतरी केंशी झालेली बातचीत.इतकंच.

केंशी असा हलकासा असणारा संबंध ते आम्हाला शिकवायला आल्यावर अधिक दृढावला. के समजूतदार होते, समाजाबद्दलची त्यांची जाणीव एका स्थिर माणसाची होती. ह्या जगात वेळोवेळी सापडणारा मसिहा असण्याचा खोटा आत्मविश्वास, उगाच सगळ्या गोष्टींना 'मोठे' करण्याची वृत्ती, असे काहीच त्यांच्या शब्दातून कधीच उमटले नाही. एव्हाना केंशी बोलण्याचा संबंध ब-याच कारणांनी आला पण नेहमीच ते आणि त्यांचे 2 मिनिटं शांतता बाळगून विचार करायला लावणारे विनोद यापलीकडे संभाषण गेले नाही. के कधीही उगाच कुणाशीही बोलताना दिसले नाहीत. महत्वाचे म्हणजे उगाच कुणाशी गोड गोड बोलताना दिसले नाहीत. इथपर्यंतच्या अनुभवात कें बद्दल विषद केलेले गुण कुठेही अनुभवला काय वासाला पण लागले नाहीत.

कें ना अजून एक विषय आमच्या वर्गावर मिळाला. ते छान शिकवत होते, विचारपूर्वक. त्यांनी मांडलेले विषय पटत होते आणि के आवडायला लागले होते. या निमित्ताने केंशी वाद घालण्यासाठी वर्ग हे व्यासपीठही मिळाले होतेच. या प्रश्नांमध्ये वावरत असताना, वास्तव आणि मोठे (खोटे) गळ्याखाली उतरवले जाणारे विचार, तत्त्व, आणि एकंदरीतच समाजाचा घाणेरडा बुरखा यातून चीड व्यक्त होत असताना, केंच्या एका तासामध्ये एका चर्चेत ते ओतू जाऊ लागले. आणि केंसाठी मी एक पत्र लिहिले.
मधल्या काळात कधी नाही पण त्या क्षणांना केंबद्दल सांगितलेल्या थापा मनात आल्या. 'खरंच या माणसाबद्दल जे सांगितलेले ते खरे असेल तर आपले व्यवस्थेच्या विरुद्ध असणारे विचार चव्हाट्यावर जाणार.' त्याची भीती नसली तरी ते नको होते.
केंनी मला दोन दिवसात बोलावले. त्यांच्या समोर बसले. त्यांनी त्यांच्या लहानश्या बोटांनी पत्र शर्टाच्या खिशातून बाहेर काढले. डोळ्यावर चष्मा चढवला. मला गरज नसताना अपराध्यासारखं वाटू लागलं. केंनी एकदा पुन्हा पत्रावरून नजर फिरवली. पहिले वाक्य वाचलं, त्यावर माझे म्हणणे नीट विचारले. दुसरे वाक्य आणि पुन्हा तेच. असं त्यांनी प्रत्येक वाक्याचा नीट उहापोह करून मग मला जे समजवायचे होते ते सांगितले. हे सगळंच एकंदरीत अनपेक्षित होते.
केंच्या तासाला वाद घालायला, मनमोकळेपणे प्रामाणिक मत मांडायला लागले.

आता केंबद्दल एक आत्मीयता वाटायला लागली होती, माणूस असण्याची आत्मीयता.
याच काळात काही वाकड्या गोष्टीना वाचा फोडण्यासाठी केलेल्या उपक्रमात केंची सोबत घेण्याचे ठरवले आणि ते फळाला आले. त्या दोन दिवसात के बरोबर होते. फार काही न बोलता पण खूप आधार वाटला त्यांच्या असण्याचा.
आता केंना ख-या अर्थाने थोडेथोडके का होईना ओळखायला लागले होते.
१. ज्यांच्या कपाटात श्याम मनोहर आणि भालाचंद्र नेमाडे सापडतात ते के. आणि वर्षातून एकदा या लेखकांचे पारायण करणारे के
२. जे गोष्टीना idealismचा चष्मा लावून पाहत नाहीत ते के.
३. या मानसिक दलदलीत स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत आलेले के. (इतरांसारखे सगळा खोटा बाजार मांडणे सहज शक्य आणि श्रमबचतीचे आहे.)
४. कोणत्याही स्तुतीरूपी प्रलोभनांना नीटच ओळखणारे आणि स्थिरबुद्धी राहणारे के.
५. माणसाने कायम झगडत राहावे आणि जे-जे चुकीचे वाटते तिथे झुरत राहावे असं गरजेचे नाही. पण किमान एक तळमळ असावी लागते. त्या तळमळीला जपत राहिलेले के.

हर्षदा विनया

March 15, 2011

...

'रस्त्यावरून आणले मला, आई सोडून गेलेली' इतकीच आठवण सांगणारी अंजली.
'असे.. असं हात बांधून मारले मला, थोटे बाईनी'हे सुद्धा खिदळत सांगणारी आक्का.
४५ मुलींचे हे घर. सगळ्या बहूतेक अश्या रस्त्यावर सोडून दिलेल्या. दोष काय? तर मतिमंदत्व..कुणाला रस्त्यावरून आणलं, कुणाला येरवड्याहून
treatment घेऊन, कुणाला आर्थिकदृष्ट्या मोडकळीला आलेल्या आश्रामातून..
'आई बाप नाहीये' याबरोबरच सुरु होणारा आमचा दिवस. 'तू आहे मला, माझी आहे' अशी आपली होणारी वाटणी.
कसलीच नीटशी जाणीव नसलेलं त्यांचं आयुष्य, अगदी पोटात किती अन्न ढकलायाच याचीही कल्पना पुरेशी नाही.पण माणूस योनीत जन्माला आलो आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भोगायला लागणारे 'स्त्री-धर्माचे' त्रास!
प्रेमाचा, मायेचा असा.. काहीच अनुभव नाही.

'आई बात मेले ना तेवा एक मानुस लस्त्यावर सोलून देला..मला नादले कलुन बलात्काल केला मद मालले' १२ वर्षाच्या पायलचे हे उद्गार ऐकून क्षण थांबले.
मतिमंद मुलींवर होणारे बलात्कार किंवा अन्य अत्याचार क्रुरपणाचा कळस आहे. अश्या मुलांवर सर्रास अत्याचार होतात. ज्या संस्थांमध्ये ते असतात तिथेही कुणासाठी punch bag होतात तर कुणासाठी sex toy.

अधिक बोलणे न लगे.. खूप जड मेंदूने लिहिलंय.. इतकंच कि जर एखादे मतिमंद मुल, विशेषतः मुलगी, असे कुठे नजरेच्या टप्प्यात दिसले तर पटकन पावले वळवू नका. दुर्लक्ष नको. योग्य ठिकाणी पोहचवले तर खूप अनर्थ टाळता येईल.