March 28, 2012

वादळ वितळलं

परवा दिवशी आलं होतं एक वादळ,
घोंगावत, गर्जना करत,
नदी समुद्र सारे, आपल्या बोटांवर उचलून.
आलं होतं एक वादळ..
मी पाहिलं त्याला येताना..
काळा धुरळा उडवत.. तसंच..
..
पसरले बाहू आणि
म्हणाले त्याला ..
'ये .. ये रे माझ्या पिल्ला,
त्रास होतोय ना रे फार तुला!'
..
वादळ वितळंल...

हर्षदा विनया

March 11, 2012

ती..

ती राहते कुठल्यातरी तोडक्या-मोडक्या माणसांच्या गावात. जिथे आहेत घरं खूप सारी, वस्त्या जाती-जातीच्या... बायका राहतात गावात अन पुरुषही, काही underdeveloped बायका आणि पुरुष..
गाव.. जिथे बायका घराच्या उंबरठ्यांवर बसून मारतात गप्पा तिच्याबद्दल, इथल्या-तिथल्या..काळजी घेतात त्या, उंबरठ्याबाहेर पाय न पडू देण्याची...
जिथे पुरुष जमतात चौकात, देवळाच्या अंगणापाशी, हसतात खिदळतात- तिचा विचार करून..कुत्सित हसतात- डोळे लावतात तिच्या उंब-याशी, जिभल्या चाटतात आणि थुंकतातहि त्याच उंब-याशी.. तिच्या उंब-याशी..

- ती असते अशीच कुणीतरी.. कुणीतरी जिला 'टाकून' दिलंय तिच्या 'नव-यानी'.. कारण..
तिला स्वयंपाक फार चांगला जमत नव्हता / ती दिसायला देखणी नव्हती / त्याला 'नांदायची' ईच्छाच नाही तिच्याबरोबर / ती रोज रात्री त्याला स्वतःपाशी झोपू देत नव्हती / त्याला दुसरीच बाई हवी/ किंवा अगदी बसं, वाटलं 'हि नको आता' म्हणून.. ई., ई.

- ती जाते दुस-यांच्या शेतात मजुरीसाठी आपल्या दारुड्या नवऱ्याकडे तुच्छतेने बघून, आणते पन्नास-साठ (पुरुष मजूराचा अर्धा पगार), घरात येऊन कोरड्या भाक-या घशात भरते मुलांच्या, आणि उपाशी पोटी घेते अंगावर एक गलिच्छ प्राणी

- ती, असते १२-१३ वर्षांची, लग्न झाल्यावर प्रत्येक रात्री लाथा बुक्क्यांचा मार खाते, नवऱ्याला 'नीट' जवळ येऊ देत नाही म्हणून. दिवस रात्र डोळ्यात मेलेलं आयुष्य आणि अंधारी भीती घेऊन वावरत राहते, गोठ्यात, तळ्यापाशी, शेतात, आपली नीट न बसलेली साडी सावरत.. मोठी होते, मुलं जन्माला घालते, म्हातारी होते, त्याच भीतीच्या पदराखाली..

- ती असते सत्तर पंच्याहत्तर ची, एका सहावारी साडीपासून बनवलेली दोन लुगडी आलटून पालटून नेसत.ती राहते एका खोपटीत तिच्या मुलाच्या घरापाशी. ती नेहमीच आढळते लोकांच्या दाराशी जेवणांच्या वेळेला. सुनेची आणि मुलाची नजर चुकवत घेते एखादी शिळी भाकरी मागून. लपवते फाटक्या पदरात आणि अधाशी डोळ्यांनी बघत राहते दुस-यांची घरं जिथे नातवंडं खेळत असतात त्यांच्या आजीपाशी..

- ती असते पाच-एक वर्षांची. तिला आवडतात प्लास्टीकच्या बांगड्या, हिरव्या रंगाच्या. ती दिसते एका २-३ वर्षांच्या शेंबड्या पोराला कडेवर घेऊन, ज्याला म्हणते ती 'दादा'. चुलीवरचे गरम दुध फुंकरून पाजते त्याला स्वतःची भूक मारून. ती बदलते त्याचं बाळूतं, धुते त्याचे हगण्या-मुताण्याचे कपडे. रोज आठवणीने लावते त्याला काजळ, दुकान्याताल्या टिकल्यांच्या पॉकेटस् कडे बघत..

- ती असते एक १५-१६ ची, शाळा सोडून घरी बसवलेली. तिला पडतात स्वप्न समजूतदार, देखण्या, प्रेमळ पुरुषाची. तिने वाचल्या असतात कादंब-या ज्यात बायकाही नव-याला हाक मारतात त्याच्या नावाने, कादंब-या ज्या सांगतात गोष्टी प्रेमाच्या, प्रेयसी-प्रियकराच्या चोरून भेटीच्या, समुद्रकिना-यावरच्या शपथांच्या, आणि thye-lived-happily-ever-after अशा आशयाच्या. ती पाहते स्वप्न. आणि ऐकते, मध्यरात्री आईचे कळवळणारे आवाज. पाहते, एखादा फटका, एखादी लाथ, एखादा बुक्का कारण आई बोललेली असते एखादा शब्द 'जास्त', चढवते आवाज किंवा वागत नाही 'जसं-बापाने-सांगितले-तसे' म्हणून.. म्हणून आणि म्हणूनंच कदाचित..

अश्या असतात अनेक ती... भेटतात मला निरनिराळ्या गावांत, रस्त्यांत, गल्ली-बोळांत.. पाहतो आम्ही एकमेकांना, भेटतो, ओळखतो, जाणून घेतो.. आम्ही सांगतो गोष्टी एकमेकांना सुख-दुखःच्या.. आणि शोधतो धागे सारखेपणाचे.. आणि आमच्या विभिन्न आयुष्यातल्या अनुभवांच्या मुळाशी असलेलं समजून घेतो एक सत्य,, बाई असण्याचं..

हम्म.

पाऊलखुणा

मी पुढे निघते..
नेहमीच..
त्या ध्येयाकडे,
ज्याचे रक्तरंजित तुकडे;
फ़ेकून दिलेत त्यांनी,
चहूदिशांना...
मी पुढे निघते...

मागे उरतात,
काही पाऊलखूणा,
ज्या रुतून पडल्यात,
काही प्रश्नांमध्ये,
काही परिस्थितींत,
काही विरोधाभासांत..
त्यांच्या समाध्यांवर अश्रू गाळून,
मी निघते पुढे...
.
.
एक दिवस पोहोचलेच कधी,
त्या ध्येयाकडे,
तर लोक सत्काराला येतील.
विराजमान करू पाहतील एका सिंहासनावर.
तेव्हा मागून घेईन थोडा वेळ त्यांच्याकडून
आणि मागे येईन,
त्या पाऊलखूणांपाशी..
त्यांचे भग्न अवशेष जमवून घेईन
आणि जडवून घेईन,
त्या पाउलखुणा माझ्या मुकूटात,
त्या मुकूटाला डोक्यावर बसवूनंच,
बसेन सिंहासनावर.
म्हणजे,
तो मुकूट मला
कधीही पळ काढून देणार नाही,
त्या प्रश्नांमधुन,
विरोधाभासांतून,
परिस्थितींतून..

मी स्थिरावले असेन सिंहासनी,
पण तरिही कदाचित,
निघाली असेन पुढे..

हर्षदा विनया