March 11, 2012

पाऊलखुणा

मी पुढे निघते..
नेहमीच..
त्या ध्येयाकडे,
ज्याचे रक्तरंजित तुकडे;
फ़ेकून दिलेत त्यांनी,
चहूदिशांना...
मी पुढे निघते...

मागे उरतात,
काही पाऊलखूणा,
ज्या रुतून पडल्यात,
काही प्रश्नांमध्ये,
काही परिस्थितींत,
काही विरोधाभासांत..
त्यांच्या समाध्यांवर अश्रू गाळून,
मी निघते पुढे...
.
.
एक दिवस पोहोचलेच कधी,
त्या ध्येयाकडे,
तर लोक सत्काराला येतील.
विराजमान करू पाहतील एका सिंहासनावर.
तेव्हा मागून घेईन थोडा वेळ त्यांच्याकडून
आणि मागे येईन,
त्या पाऊलखूणांपाशी..
त्यांचे भग्न अवशेष जमवून घेईन
आणि जडवून घेईन,
त्या पाउलखुणा माझ्या मुकूटात,
त्या मुकूटाला डोक्यावर बसवूनंच,
बसेन सिंहासनावर.
म्हणजे,
तो मुकूट मला
कधीही पळ काढून देणार नाही,
त्या प्रश्नांमधुन,
विरोधाभासांतून,
परिस्थितींतून..

मी स्थिरावले असेन सिंहासनी,
पण तरिही कदाचित,
निघाली असेन पुढे..

हर्षदा विनया

2 comments:

Archetypes India said...

भूत-भविष्य-वर्तमानात ही कविता लीलेने फिरते व समेवर येते. इथे "रिअर व्ह्यू मिरर" शाबूत आहे हे पाहून फार बरे वाटले.

Harshada Vinaya said...

:) Thanks Remi..