March 11, 2012

ती..

ती राहते कुठल्यातरी तोडक्या-मोडक्या माणसांच्या गावात. जिथे आहेत घरं खूप सारी, वस्त्या जाती-जातीच्या... बायका राहतात गावात अन पुरुषही, काही underdeveloped बायका आणि पुरुष..
गाव.. जिथे बायका घराच्या उंबरठ्यांवर बसून मारतात गप्पा तिच्याबद्दल, इथल्या-तिथल्या..काळजी घेतात त्या, उंबरठ्याबाहेर पाय न पडू देण्याची...
जिथे पुरुष जमतात चौकात, देवळाच्या अंगणापाशी, हसतात खिदळतात- तिचा विचार करून..कुत्सित हसतात- डोळे लावतात तिच्या उंब-याशी, जिभल्या चाटतात आणि थुंकतातहि त्याच उंब-याशी.. तिच्या उंब-याशी..

- ती असते अशीच कुणीतरी.. कुणीतरी जिला 'टाकून' दिलंय तिच्या 'नव-यानी'.. कारण..
तिला स्वयंपाक फार चांगला जमत नव्हता / ती दिसायला देखणी नव्हती / त्याला 'नांदायची' ईच्छाच नाही तिच्याबरोबर / ती रोज रात्री त्याला स्वतःपाशी झोपू देत नव्हती / त्याला दुसरीच बाई हवी/ किंवा अगदी बसं, वाटलं 'हि नको आता' म्हणून.. ई., ई.

- ती जाते दुस-यांच्या शेतात मजुरीसाठी आपल्या दारुड्या नवऱ्याकडे तुच्छतेने बघून, आणते पन्नास-साठ (पुरुष मजूराचा अर्धा पगार), घरात येऊन कोरड्या भाक-या घशात भरते मुलांच्या, आणि उपाशी पोटी घेते अंगावर एक गलिच्छ प्राणी

- ती, असते १२-१३ वर्षांची, लग्न झाल्यावर प्रत्येक रात्री लाथा बुक्क्यांचा मार खाते, नवऱ्याला 'नीट' जवळ येऊ देत नाही म्हणून. दिवस रात्र डोळ्यात मेलेलं आयुष्य आणि अंधारी भीती घेऊन वावरत राहते, गोठ्यात, तळ्यापाशी, शेतात, आपली नीट न बसलेली साडी सावरत.. मोठी होते, मुलं जन्माला घालते, म्हातारी होते, त्याच भीतीच्या पदराखाली..

- ती असते सत्तर पंच्याहत्तर ची, एका सहावारी साडीपासून बनवलेली दोन लुगडी आलटून पालटून नेसत.ती राहते एका खोपटीत तिच्या मुलाच्या घरापाशी. ती नेहमीच आढळते लोकांच्या दाराशी जेवणांच्या वेळेला. सुनेची आणि मुलाची नजर चुकवत घेते एखादी शिळी भाकरी मागून. लपवते फाटक्या पदरात आणि अधाशी डोळ्यांनी बघत राहते दुस-यांची घरं जिथे नातवंडं खेळत असतात त्यांच्या आजीपाशी..

- ती असते पाच-एक वर्षांची. तिला आवडतात प्लास्टीकच्या बांगड्या, हिरव्या रंगाच्या. ती दिसते एका २-३ वर्षांच्या शेंबड्या पोराला कडेवर घेऊन, ज्याला म्हणते ती 'दादा'. चुलीवरचे गरम दुध फुंकरून पाजते त्याला स्वतःची भूक मारून. ती बदलते त्याचं बाळूतं, धुते त्याचे हगण्या-मुताण्याचे कपडे. रोज आठवणीने लावते त्याला काजळ, दुकान्याताल्या टिकल्यांच्या पॉकेटस् कडे बघत..

- ती असते एक १५-१६ ची, शाळा सोडून घरी बसवलेली. तिला पडतात स्वप्न समजूतदार, देखण्या, प्रेमळ पुरुषाची. तिने वाचल्या असतात कादंब-या ज्यात बायकाही नव-याला हाक मारतात त्याच्या नावाने, कादंब-या ज्या सांगतात गोष्टी प्रेमाच्या, प्रेयसी-प्रियकराच्या चोरून भेटीच्या, समुद्रकिना-यावरच्या शपथांच्या, आणि thye-lived-happily-ever-after अशा आशयाच्या. ती पाहते स्वप्न. आणि ऐकते, मध्यरात्री आईचे कळवळणारे आवाज. पाहते, एखादा फटका, एखादी लाथ, एखादा बुक्का कारण आई बोललेली असते एखादा शब्द 'जास्त', चढवते आवाज किंवा वागत नाही 'जसं-बापाने-सांगितले-तसे' म्हणून.. म्हणून आणि म्हणूनंच कदाचित..

अश्या असतात अनेक ती... भेटतात मला निरनिराळ्या गावांत, रस्त्यांत, गल्ली-बोळांत.. पाहतो आम्ही एकमेकांना, भेटतो, ओळखतो, जाणून घेतो.. आम्ही सांगतो गोष्टी एकमेकांना सुख-दुखःच्या.. आणि शोधतो धागे सारखेपणाचे.. आणि आमच्या विभिन्न आयुष्यातल्या अनुभवांच्या मुळाशी असलेलं समजून घेतो एक सत्य,, बाई असण्याचं..

हम्म.

4 comments:

सुप्रिया.... said...

My god Harshada....

कितीही सुधारणेच्या गप्पा मारल्या तरी तळागाळातल्या(एकूणच) "ती" च आयुष्य बदलता येईल का?

Harshada Vinaya said...

Hey Hi Supriya,
I wonder about ur expression, u have capitailzed 'H' in Harshada and not 'G' in God! Majja watli!
Ok.. tee's life will change if she wants to. Definitely!

Archetypes India said...

'ती'ची ही शब्दचित्रांत नोंदणी संदर्भासाठी फार उपयोगी. अशी चित्रे, थोड्याफार फरकाने, मी मुंबईच्या रस्त्यांवर रोज पहातो आणि कधीकधी मोबायलवर छायाचित्रांत टिपतो. [माझ्या मराठी ब्लॉगवर जरूर पहा - 'बांबूला काटा आला' व बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला (छायाचित्रांसह).] मात्र राजेशाही घरांतील उच्चभ्रू 'ती'ची चित्रे देशी टीवी मालिकांवर तसेच अदालत / दस्तक या मालिकांत पहायला मिळतात. तात्पर्य : आमच्या वैभवशाली भूतकाळाचा हा परिपाक. जातकांत ई.स.पूर्व तत्कालीन गाथा-कथांतपण 'ती' वाचायला मिळाली. विखंडित (पुरुषप्रधान) नागरी समाजात वेगळं काय बघायला मिळणार? केवळ काही अंशांचा फरक. या लेखनात 'ती'च्या अनेक बाजूंपैकी एक बघायला मिळते. Link to bamboo> http://remichimarathiboli.blogspot.in/2012/02/blog-post.html

आशा जोगळेकर said...

त्या तीं च्या डोळ्यातली स्वप्नंच त्यांचं जीवन बदलायला कारणीभूत ठरतील .