May 16, 2012

लक्ष्मीचं बाळ

मी नुकताच जन्माला आलो.. आई म्हणते मी दीड महिन्यांचा आहे. मला अजून नावच ठेवले नाहीये. कुणीही काहीही हाका मारतं, बाळू, बाबू, और पता नही क्या क्या. आई मला पिलू म्हणते म्हणून मला पिलूच नाव आवडते. आईला अजून माहितीच नाहीये कि मला सगळ्या भाषा कळतात. मी ऐकतो सगळ्यांचे बोलणं, त्या बाजूच्या पलंगावरच्या रहिमा मौसीचं पण,ती त्या 'बंगाली' भाषेत तिच्या मुलांशी बोलत असते काही बाही जिभेवर साखर ठेवल्यागत..आम्ही तिथे राहतो.. नीट माझ्या बोटाच्या दिशेने बघा..या पलीकडच्या गल्लीतली चाळ. ती..ती..चार माळ्यांची. जिथे कावळ्यासारखी मान वर करून पाहिलं कि दिसतात काही कोंदटलेल्या, अंधा-या खिडक्या. आणि बगळ्यासारखी केली मान खाली कि दिसतो एक लाकडी जीना, 'वर' जाणारा.. माझ्या आईच्या पावलाचा अर्धाच भाग मावेल इतकीच पाया-यांची रुंदी ..असो.. तर असा तो जीना नि ती चाळ..त्या पलीकडच्या गल्लीतल्या, चार मजल्यांच्या चाळीतल्या, चौथ्या माळ्यावरच्या, कोप-यातल्या खोलीतल्या पाच पलंगांपैकी ,दरवाज्याकडून तिसरा पलंग आमचा आहे, म्हणजे माझ्या आईचा आहे. तिचं नाव लक्ष्मी.

लक्ष्मीआई आहे २४ वर्षांची. ती सुंदर आहे.. सगळे म्हणतात कि,' आईपणाचे तेज अजुनही वावरतेय तिच्या बाळसेदार चेह-यावर'. लक्ष्मीआई आठ वर्षांपूर्वी या गल्लीत राहायला आली, किंवा ती म्हणते तसे,'फसवून आणली तिच्या काकानं'. ती गावच्या शाळेत गेली पण चौथी नापास झाली, मग घरात बसून ओझं होती म्हणून काकानं धुण्याभांड्याची कामं मिळवून देतो म्हणून आणली मुंबईत. त्या काकाने मग तिला इथे विकून टाकलं. आमच्या गल्लीत अशी माणसं विकतात काहीकाही लोकं, घासाघीसही करतात. हम्म.. तर मग लक्ष्मीआई मला कायम पोटाशी लावून असते. खूप खूप प्रेम करते ती.. पण ना, ती खुपदा माझ्याकडे बघून नजर वळवून रडत राहते. मला बोलता येत नाही म्हणून, नाहीतर मी लक्ष्मीआईला तिच्या रडण्याचं कारण विचारलं असतं, पण ती सांगणार नाही मला, रहिमा मौसिला सांगेल कदाचित.
आमच्याकडे एक माणूस येतो दिवसातून एकदा दोनदा. अगदी हडकुळा, काळासा.. आई मला त्याच्याकडे बोट दाखवून 'पप्पा' म्हणायला शिकवत असते. मला जमलं ना बोलायला तरी पप्पा म्हणणार नाही त्या काळ्याला, तो आईला मारतो माझ्या.. सारखं म्हणत असतो,'तेरोको बोला था लक्ष्मी इसको गिरा देने का था पैले बच्चो माफिक, साला अभी ऐन टाईम पे धंदा बरबाद करता ये और तू साली, इसको रातकु बिस्तर के नीचेभी नही छोडती, छातीसे लगाके रखती. देख तेरोके एक बार बोलता, कष्टमर गया ना तेरा फिर नही आयेगा.. साली बच्चा पैदा करने का था तो रंडी कायकू बनी. अभी तू रुक, तेरा हाथ पैर तोडता मैं, फिर मांगना भीख इसको छातीसे लगाके'... म्हणजे मला अजून मोठे ताई-दादा होते तर.. फार दुष्ट आहे हा. मी ना आईचं दुध पिताना तिच्या छातीवर खूप व्रण पाहिलेत, ह्यानेच मारलं असेल किंवा... नसेलही.. आई मला सगळ्यांसमोरंच दुध पाजते. मी हाँस्पिटल मध्ये जन्माला आलो ना, तिथे ना बायका आपल्या मुलांना पदराच्या आत लपवून दुध पाजायच्या. लक्ष्मीआई तसं करतंच नाही. मला लाजंचं वाटते सगळ्यांसमोर दुध प्यायला.

मी यायच्या आधी आईचा दुसरा आदमी होता. तो ना सारखा आईला चटके द्यायचा, मारायचा, मग आईने ते घर सोडलं आणि आई रहिमा मौसी बरोबर इथे आली, मी पोटात होतो आईच्या..तेव्हा बरं होतं आपलं, आईजवळ तर असायचो! आता तर सगळे आईला मला टाकून द्यायला सांगतात. इथे आल्यावर आईने हा आदमी केला, हा मारतो, चटके देत नाही.. पण ना हा आदमी आईला पैसेच देत नाही, तिचे सगळे पैसे घेऊन टाकतो. मागे मला दवाखान्यात न्यायचे होते, तर आईने याच्याकडे पैसे मागितले. तर ह्याने दिलेच नाहीत, म्हणाला,'साला ये दवाईबिन मर जाईंगा तोच ठीक'.. दुष्ट कुठला. मला तर वाटतं लक्ष्मीआईने यालाही सोडून द्यावे, आणि नवीन छान पप्पा शोधावे. आमच्या गल्लीत अजून खूप लहान बाळं आहेत. पलंगांखाली जिथे स्टोव्ह आणि डबे असतात ना तिथे झोपतात ती. त्यांची आई त्यांना रात्री दूधही पाजत नाही 'कस्टमर' आले कि आणि त्यांनी अंथरूण ओलं केलं तरी सकाळीच बदलतात. माझी आई चांगली आहे, माझी खूप काळजी घेते ती.

आमच्या गल्लीत मुलं अशीच वाढतात. थोडी मोठी झाली कि ती घराच्या बाहेर उंबरठ्यावर झोपतात, किंवा उगाच बस्तीत फिरत राहतात. तसं मुलं फिरतात, मुलींना मात्र आया कुठेतरी कोप-यात झोपवतात. आमच्या बस्तीत येणारी माणसं चांगली नसावीत बहुतेक, कारण ती लहान मुलींना पण मागतात म्हणे. म्हणून आया लपवून ठेवतात मुलींना. बरं झालं मी मुलगा आहे नाही..

काही दिवसांनी आईही मला पलंगाखाली झोपवेल, रहिमा मौसी तिच्या हसन ला झोपवते तशी. मग आई कदाचित मला टाकून देईल. नाही, माझी आई तशी नाहीये, ती सांभाळेल मला. मला ना मोठा होऊन हाँस्पिटल मधलं डाँक्टर व्हायचं आहे, मग मी आईचे व्रण बरे करेन..अशी माझी बरीच स्वप्न आहेत.. मी बोलायला लागलो कि सगळं सांगणार आहे आईला. आणि नवीन पप्पा शोधायला पण सांगणार आहे. मला माहितीये आई माझं ऐकेल..


हर्षदा विनया

3 comments:

केदार said...

तुमच्या ब्लॉगचे नावच छान आहे. चित्रपटात अनेक करड्या छटांच्या व्यक्तिरेखा असतात. चित्रपटांच्या फॅन असाल तर त्यांच्याबदद्लही लिहा. बाकी शुभेच्छा.

aativas said...

विषय एकदम संवेदनशील आहे आणि मांडलाही आहे संवेदनशीलपणे. फक्‍त 'लहान मुलाच्या तोंडी ही भाषा असेल का (आणि अर्थात त्यातले विचारही) ' असा प्रश्न पडला. इथं मूल प्रतीकात्मक आहे आणि प्रश्न महत्त्वाचा आहे याची मला जाणीव आहे तरीही असं वाटलंच हे मात्र खरं.

स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.

Harshada Vinaya said...

@ सविता ,स्पष्ट लिहिण्याबद्दल क्षमस्व का असावं बरं कुणी? तुम्ही जे म्हणताय त्यांची मलाही आहे कल्पना पूर्ण खरं तर..पण मी तसंच लिहिलं, का.. ते माहीत नाही. :-)
@ केदार, आवडतात सिनेमे पहायला.. पण लिहिलं नाही कधी काही .. बघू..पुढे मागे..