June 20, 2012

Reworked on "लक्ष्मीचं बाळ"


मी राजू. रोज जातो शाळेत. तिसरीत आहे मी, म्हणजे आता सुटट्या संपल्या कि जाईन चौथीत. माझे एक, दोन... हम्म.. तीन.. ......हम्म.. आठ... दहा .. हम्म.. बारा.. हो बारा मित्र आहेत, सगळे ह्या बस्तीतलेच. माझ्या वर्गात बस्तीतला रेहमान आहे, शाळेत त्याच्याशीच बोलतो मी फक्त. आई म्हणते उगाच कुणाशी जास्तीची मैत्री करू नकोस आणि मित्रांना कधीच घरी आणू नकोस म्हणून. मग न बोललेलंच बरं. उगाच मैत्री करून मग किती बोलायचं, काय बोलायचं, याची गणितं करत बसण्यापेक्षा. आपला रेहमान बरा. राजू आणि रेहमान, रेहमान आणि राजू. आमच्यावर पण एक शिनेमा निघायला हवा.
आम्ही तिथे राहतो.. नीट माझ्या बोटाच्या दिशेने बघा..या पलीकडच्या गल्लीतली चाळ. ती..ती..चार माळ्यांची. जिथे कावळ्यासारखी मान वर करून पाहिलं कि दिसतात काही कोंदटलेल्या, अंधा-या खिडक्या. आणि बगळ्यासारखी केली मान खाली कि दिसतो एक लाकडी जीना, 'वर' जाणारा.. माझ्या आईच्या पावलाचा अर्धाच भाग मावेल इतकीच पाया-यांची रुंदी ..असो.. तर असा तो जीना नि ती चाळ..त्या पलीकडच्या गल्लीतल्या, चार मजल्यांच्या चाळीतल्या, चौथ्या माळ्यावरच्या, कोप-यातल्या खोलीतल्या पाच पलंगांपैकी ,दरवाज्याकडून तिसरा पलंग आमचा आहे, म्हणजे माझ्या आईचा आहे. तिचं नाव लक्ष्मी.
लक्ष्मीआई आहे २४ वर्षांची. ती सुंदर आहे.. लक्ष्मीआई आठ वर्षांपूर्वी या गल्लीत राहायला आली, किंवा ती म्हणते तसे, 'फसवून आणली तिच्या काकानं'. ती गावच्या शाळेत गेली पण चौथी नापास झाली, मी आईपेक्षा जास्त शिकणार बहुतेक! मग घरात बसून ओझं होती म्हणून काकानं धुण्याभांड्याची कामं मिळवून देतो म्हणून आणली मुंबईत. त्या काकाने मग तिला इथे विकून टाकलं...हम्म.. मला बाबा नाहीत. म्हणजे आहे तो एक माणूस, त्याच्याबद्दल नंतर सांगतो. बरं तर, सांगायचे हे कि आमच्या गल्लीत अशी माणसं विकतात काहीकाही लोकं, घासाघीसही करतात. तर मग लक्ष्मीआई माझ्यावर खूप खूप प्रेम करते. पण ना, ती खुपदा माझ्याकडे बघून नजर वळवून रडत राहते. मी विचारतो आईला तिच्या रडण्याचं, पण ती सांग नाही मला, रहिमा मौसिला सांगेल कदाचित.
आमच्याकडे एक माणूस येतो दिवसातून एकदा दोनदा. राजाण्णा नाव आहे त्याचे. अगदी हडकुळा, काळासा. आला कि मला कमीत कमी एक टपली मारून जातोच. आई म्हणते त्याच्या नावावरूनच राजू नाव ठेवले माझे. श्या!! मोठा झाल्यावर नाव बदलून नाही घेतले ना, तर नाव राजू सांगणार नाही. आई मला त्याला 'पप्पा' म्हणायला सांगत असते. मला अजिबात नाही आवडत त्या काळ्याला हाक मारायला, तो आईला मारतो माझ्या. माझ्यावर तर फार फार जळतो तो. इतका जळूनच कोळश्यासारखा झालाय. सारखं म्हणत असतो,इसको वो ऑफिस वाली बाई से बोलके कही अनाथाश्रम या ऐसाइच् किदर छोड के क्यू नही आती? रात का टाईममेंच इसको तू चाहिये चीपकके सोने माफिक, साला ऐन धंदेका टाईम बरबाद करता ये. देख तेरोके एक बार बोलता, कष्टमर गया ना तेरा फिर नही आयेगा.. साली बच्चा संभालने का था तो रंडी कायकू बनी. अभी तू रुक, तुम दोनो का हाथ पैर तोडता मैं, फिर मांगना भीख इसको छातीसे लगाके...
मी जन्माला यायच्या आधी आईचा दुसरा आदमी होता. मला शेजारच्या हसीनामौसीने सांगितलं, कि जुना आदमी आईला चटके द्यायचा, मारायचा, मग आईने ते घर सोडलं आणि आई रहिमा मौसी बरोबर इथे आली, मी पोटात होतो आईच्या..तेव्हा बरं होतं आपलं, आईजवळ तर असायचो! आता तर सगळे आईला मला टाकून द्यायला सांगतात. इथे आल्यावर आईने हा आदमी केला, हा मारतो, चटके देत नाही.. पण ना हा आदमी आईला पैसेच देत नाही, तिचे सगळे पैसे घेऊन टाकतो. मागे मला दवाखान्यात न्यायचे होते, तर आईने याच्याकडे पैसे मागितले. तर ह्याने दिलेच नाहीत, म्हणाला,'साला ये दवाईबिन मर जाईंगा तोच ठीक'.. दुष्ट कुठला. मला तर वाटतं लक्ष्मीआईने यालाही सोडून द्यावे, आणि नवीन छान पप्पा शोधावे. आमच्या गल्लीत अजून खूप लहान बाळं आणि मुलं आहेत. पलंगांखाली जिथे स्टोव्ह आणि डबे असतात ना तिथे झोपतात ती.
आमच्या गल्लीत मुलं अशीच वाढतात. थोडी मोठी झाली कि ती घराच्या बाहेर उंबरठ्यावर झोपतात, किंवा उगाच बस्तीत फिरत राहतात. तसं मुलं फिरतात, मुलींना मात्र आया कुठेतरी कोप-यात झोपवतात. आमच्या बस्तीत येणारी माणसं चांगली नसावीत बहुतेक, कारण ती लहान मुलींना पण मागतात म्हणे. म्हणून आया लपवून ठेवतात मुलींना. बरं झालं मी मुलगा आहे नाही..
मला वाटतं मोठे होऊन पोलीस व्हावे आणि आईला त्रास देणा-या सगळ्यांना जेल मध्ये टाकावं. मी काय काय ठरवून ठेवलंय, गाडी बिडी कोणती घ्यायची मोठा झाल्यावर ते. बाकी तसा मी हुशार आहे अभ्यासात. दिवसाचा बराच वेळ पुस्तकच वाचत राहतो नाहीतर आमच्या चाळीत खाली तिस-या माळ्यावर एक काचकारखाना आहे, तिथल्या रमेशभैया आणि अन्वरभैयाशी बोलत बसतो. आणि रात्री असं काय काय लिहीत बसतो.
हर्षदा विनया

2 comments:

चैताली आहेर. said...

>>>माझ्यावर तर फार फार जळतो तो. इतका जळूनच कोळश्यासारखा झालाय. <<<

>>>बरं झालं मी मुलगा आहे नाही..<<<

such sentences shows that you were in Raju's character totally while writing... i luv ur writing always as it touches my heart though you use in simple laguage...!

Harshada Vinaya said...

@Chaitali Tai, tu vachtes hech chhan vatate mala! :) Thank u