July 1, 2012

पुस्तकाचे ऑपरेशन

'दुरित' यांचा 'खो' मिळाला. खो बद्दल फारसे माहीत नव्हतं आधी. म्हणून ते समजून घेतलं. :) या खो ची सुरुवात इथे झाली...
२-३ दिवस म्हणून पाचव्या दिवशी लिहिते आहे.. रविवार यावच लागतो.

'सोनुबाई आणि कथलाचा वाळा' असं कोणत्या पुस्तकाबद्दल नाही वाटलं मला कधी खरं तर. पुस्तकातल्या कथा, पात्र आणि एकंदरीत घटना या सगळ्यापेक्षा मी त्यां मागच्या लेखकांशी जास्त connect/disconnect होत गेले त्यामुळे असेल कदाचित.. In fact, अगदीच न आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाच्या डोक्याचा मागोवा घेत 'त्या' व्यक्तीचं 'ह्या'-'त्या' विषयावर काय मत असेल किंवा एका ठराविक पद्धतीच्या घटनांना ही व्यक्ती कसं react करेल, असले खेळ खेळत बसले आहे.

'दुरित' यांचा खो मिळाल्याबरोबर डोक्यात चक्र सुरु झालं. . खूप पुस्तकांची नावं, त्यांच्या कथा नाचून गेल्या मेंदूत. नुकतीच अशी न पटलेली दोन पुस्तकं आठवली. ती म्हणजे , अरविंद अदिगा चं 'द व्हाईट टायगर' आणि ओरहान पामुक यांचं 'माय नेम इज रेड'. दोन्हीही मोठी पारितोषिकं मिळालेली पुस्तकं. , पण वाचताना पुस्तकं फार काही देऊन जात आहेत असं वाटलं नाही. या विषयाचा भुंगा मनात असताना कपाटात दासबोध दिसला...ठरवून टाकलं कि दासबोधावर लिहू. ते कारण सगळ्यात जास्त अपेक्षाभंग या पुस्तकाने केला आहे आपला. एखादी चिमणी विमानाचा स्फोट घडवून आणू शकते ना त्या रिलेटिव्ह स्पीड च्या नियमाप्रमाणे असतं अपेक्षाभंगाच! दासबोध वाचायला घेतला, मुद्देसूद अभ्यासाला लागले, पण अजून वेळ हवा आहे असं वाटून मग पुढचे काही दिवस अभ्यास करून मग लिहू असं ठरवून, शेवटी माझी ग्रंथजगतातली प्रदक्षिणा संपवून ह्या पुस्तकावर येऊन थांबले- 'पिली छत्री वाली लडकी'.. एक- -दीड वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक, संदर्भ तितके ताजे नाहीत.

उदयप्रकाश हिंदी मधले नावाजलेले लेखक. 'पिली छत्री वाली लडकी' ही त्यांची सगळ्यात मोठी दीर्घ कथा-कारण कादंबरी म्हणता येण्याजोगी सलगता त्या कथेला आली नाहीये.

कथेची पार्शवभूमी: राहुल आणि अंजलीची प्रेमकथा एका मोठ्या विद्यापीठाच्या अंगणात. कथेची नायिका हिंदी सिनेमाच्या नायीकेसारखी एका उच्चभ्रू (उच्च जात देखील, हे महत्वाचे) कुटुंबातली मुलगी आणि राहुल गरीब घरातून कष्टाने शिक्षणासाठी या विद्यापीठात आलेला. अंजली तिची पिवळी छत्री घेऊन कॉलेजला येते म्हणून, या पुस्तकाचं नाव 'पिली छत्री वाली लडकी'. राहुल आणि अंजली यांच्या प्रेमाच्या पार्श्वभूमीवर लेखकाने अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
-
राहुल स्वताचा अभ्यासाचा विभाग सोडून हिंदी विभागात जातो, अंजली मुळे. तिथल्या प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या तील परस्पर संवाद, राहुलचे विचार यातून सतत साहित्य क्षेत्रातल्या 'ब्राह्मणवादावर' लेखक तोंडसुख घेतो. पुस्तकं गाजणं, अवॉर्डस् मिळणं अगदी पद्म सुद्धा)), पदवीधर असूनही सन्मान मिळणं फक्त जातीवरच अवलंबून आहे, असं एक ना अनेक पद्धतींनी लेखक भासवत राहतो.
-
ईशान्येकडील भागातील लोकांवर होणा-या अत्याचारांबद्दल.
-
एकंदरीतच विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर होणा--या ह्यांव-त्यांव राजकारणाबद्दल.

कथेचा शेवट: हे का सांगण महत्वाचे आहे ते नंतर कळेल, कथेच्या शेवटी, राहुल आणि अंजली यांच्यातला पहिला, ठरवून केलेला Boys' Hostel मधल्या शरीरसंबंधाचे वर्णन केले आहे. अंजलीची अगदीआतुरतेने वाट पाहणारा राहुल, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा राहुल, त्याचा जातीव्यवास्थेवाराचा सगळा राग, द्वेष, घृणा अत्यंत क्रूर पद्धतीने अंजलीवर काढताना दाखवला आहे. तो तिला भोगून समस्त ब्राम्हण जातीचा 'बदला' घेतो आहे अश्या पद्धतीचा आव आणून तो तिला दु:ख देत राहतो. आणि हे सगळं झाल्यावर अंजली त्याच्या अश्या वागण्याला त्याचा वाईल्डपणा वगैरे समजून, कुशीत घेते.... हुश्श्श.. आणि संपतं सगळं.

न पटलेल्या गोष्टी: शेवट वाचल्यावर ही पूर्ण कथा, राहुलचे अनुभव, त्याचा जातीव्यवस्थेचा राग, हे सगळं, ह्या शेवटच्या घटनेचं जस्टीफिकेशन द्यायला लिहिली आहे का असंच वाटत राहतं. मुळातच लेखकाने जाती-व्यवस्था, त्यांची मानवी मनातली पाळं-मुळं, ईशान्येकडच्या राज्यांमध्यल्या समस्या ह्या सगळ्याचं Over-Simplification केलं आहे या सगळ्या कथेत! चित्र एकाच रंगात रंगवली गेली आहेत. आणि वाचक ती एकाच रंगात पाहिल अशी नीट तजवीज लेखकाने कथेच्या घटनांमध्ये केली आहे.

दुसरी गोष्ट अशी कि, खूप सा-या स्ट्रेन असणा-या situations लागोपाठ लागोपाठ (साधारण १५० पानांच्या पुस्तकात) इतक्या भरल्या आहेत ही, सगळं नाटकी वाटायला लागतं, आणि मी म्हणलं तसं, शेवटचा भाग वाचून तर तिडीक आल्याशिवाय राहत नाही.

तिसरं, या पुस्तकातील पात्रांना रंगवताना एक प्रचंड मोठा stereotype आहे. . राहुलच्या कल्पनेतला एक गलिच्छ माणूस जो देशातल्या अश्या लोकांसाठीच रुपक आहे जे सगळा देश आणि त्यांची संपत्ती घशात घालायला निघाले आहेत.. अशी माणसे आपल्या देशात नाही असं नाही. पण जे खटकतं ते, ह्या माणसाचं ज्या पद्धतीने वर्णन केलं आहे. त्याची भाषा- एका समाजाकडे बोट दाखवते. काही जाती, समाजातील घटक यांना सोप्पं समीकरणं मांडून लेखकाने त्यांचे Villain बनवले आहेत- आणि Villain साधे सुधे नाहीत, ते क्रूर, अमानवीय, शारीरिक गरजांना हपापलेले, स्वार्थी आहेत हे सगळ्यात जास्त खटकत.-

देशातल्या विद्यापीठांमधिल, राज्याराज्यातीत, आणि एकंदरीत जात-धर्म-पंथ-लिंग ह्याचे राजकारण सुजाण देशवासियांना नवीन नाही. आणि हे राजकारण अधिकाधिक किचकट आणि टोकाचे होत चालले आहे कारण विरोधी उभं ठाकलेल्या दोन गटांमध्ये संवाद नाही- आहेत ती फक्त परसेप्शनस् !! रादर तो संवाद होऊ नये यासाठी अनेक जणांचे प्रयत्न असतात आणि यावरच ही मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेतात. असे दोन गट कायम एक see-saw जगत असतात, पुढे मागे जातात, पण तो 'देश' कधीच नसतो. आणि हे लेखक सपशेलपणे विसरला आहे.

Update: हा खो मी पुढे 'चैताली' ताई आणि 'रेमी' यांना देते आहे.

एक आवर्जून लिहायचं म्हणजे, मी रेमीला गेले चार-पाच वर्षे फॉलो करते आहे. आणि त्याचं लिखाण बरंच व्यासंगी, बहुआयामी असूनही, ब्लॉगजगतात तितके वाचले गेले नाही, असं माझं मत! म्हणून आवर्जून रेमी ला हा 'खो'! :)