January 21, 2015

Vividity

कसे ग रंग दिसतात इतके स्पष्ट तुला?
जणू असंख्य भिंग बसवून दिलीत,
तुझ्या त्या काळवंडलेल्या डोळ्यांमागे..
कुठून येते ही विव्हिडीटी?
अगणित करड्यांना कणाकणाने वेगळं करत,
मेंदूच्या वेगळ्या-वेगळ्या कप्प्यात स्थान देणारी,
जगणं कठीण करून सोडणारी विव्हिडीटी.
स्पर्शांचही तसंच...
थंड, गरम, मऊसुत, टणक, ओले, कोरडे..फक्त इतक्याच श्रेण्या नाहीत.
तर,
'अगदी हाडात रूतणारे' पासून ते 'त्वचेवरही न जाणवणारे',
असे रांगेत उभे करता येतील इतके स्पर्श.
अश्या बघण्या-जाणवण्यातून जन्माला येणा-या
सतराशे लाख भावना.
आणि रंगामध्ये जाणवते तशीच, भावनांची विव्हिडीटी.
हे इतके मोठं बि-हाड घेऊन कसं जगतेस बाई?

हर्षदा विनया