August 7, 2016

.

अघळ पघळ
चर्वित-चघळ
पृथ्वी त्रिभुज
माणसं तीन
ता-यांचा त्रिकोण
आणि वाढतच जाणारी पोकळी
पोकळीत भरलंय आदिम एकटेपण.
सिंदबाद- द सेलर व्हायला हवं
झेंडे रोवून, पाहून घ्यावं- जगातलं सगळं
जितकं काही- जिवंत, उन्मत्त, हिरवं
मग झेंडे उपटून निपचित तरंगावं निळ्या समुद्रात
एकटेपण आदिम आहे आणि अर्थहीनता खरी
म्हणूनच, भयाच्या गर्भातून स्त्रवायला हवी
भोगांची महत्वाकांशा!

September 30, 2015

.

तू विचारशील मी कोण म्हणून,
तेव्हा कदाचित सांगेन तुला,
नाव माझं,
एखादं छायाचित्र,
शिक्षण, पुस्तकं, कविता.


जोखशील मला, पडताळून बघशील,
मोजशील, मापशील,
येशील जवळ, किंवा नाकारशील.
बघशील, कोणते धातू बनवतात मला,
नि किती साचून राहिलेत..
अणु, रेणू माझ्यात.


पण कदाचित सांगणार नाही मी तुला..
कि धमन्यांमधून वाहते माझ्या,
ती हि एक नदी आहे.


सांगणार नाही कदाचित, ते हे..


कि उन्हाचं नुसतं स्पर्श करणं सुद्धा,
जाणवून देतं असतं मला सूर्यमालेचं अस्तित्व.


मला ओळख आहे रंगाची,
आणि कातडीतही आहेत माझ्या असंख्य रंगांच्या छटा


मला कळते भाषा, आणि अर्थहीन स्वर देखील
अर्थबोध होणं, ही माझी गरज नव्हतीच कधी.


सांगणार नाही कदाचित,
की आयुष्यातल्या प्रत्येक माणसाचा गंध ओळखून आहे मी,
प्रत्येक प्रहरात बदलत जाणारे, स्वतंत्र अस्तित्वांसारखे गंध.


सारखे गंध असणारी, दोन माणसं माहित आहेत मला..
जी विषुववृत्ताच्या दोन विरुद्ध बाजूना जगलीत आयुष्यभर, एकमेकांचे गंध सांभाळत.


समुद्र पाहिला, कि ओळख पटते मला त्याची पुन्हयांदा
शरीरातली संप्रेरके लाटा बनतात माझ्या, समुद्र पाहिला की.
कधीच सांगू शकणार नाही तुला,
की मला शारीरिक ओढ वाटते समुद्राची, पुरुषाइतकीच.


सांगणार नाही मी तुला,
कि गर्भात माया आहे माझ्या,
कि जीव लावता येतो मला
कुशीत घेऊन सांगता येतात परीकथा,
नि दुस-याच्या कुशीत शिरून ऐकत राहते मी श्वास.


कसं सांगणार मी,
हेच..
कि शिक्षण, नाव, कविता, पुस्तकं, भाषा, चित्र आणि अर्थ असलेलं सगळं,
या पलीकडेही आहे मला एक अस्तित्व,
अर्थहीन.


जे बदलणार नाही,
मी मानवी इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात जन्माला आले तरी.



September 9, 2015

.


माणसांनी येऊ नये जवळ

डोळे मिटून, 

आकडेमोड करत, किंवा शंकेत झुरत.



वल्नरेबिलीटी हा काही चॉईस नाहीये

माणसांनी यावं जवळ, 

आपण पाहिलेले सगळे सूर्यास्त घेऊन

अनवाईंड करावे शरीरातले सगळे तंतू

आणि दुस-या माणसांच्या तंतुंशी करून टाकावे सोल्डर

आर्बीट्ररी



विस्कटलेल्या अंथरुणाची

करावी लागू नये सारवासारव,

इतकं खरं - यावं जवळ

माणसांनी


June 16, 2014

कधी, कुठे, कसा, का,
वेड्यासारखा जडतो जीव
जणू प्रसावणीला वारेमध्ये
मायेपोटी अडतो जीव

रात्रोरात्री काळोखात
रंग शोधू पाहतो जीव
डोळ्याखाली समुद्रात 
भर करत राहतो जीव

चाफ्याच्या फांदीवरती 
रुसून एकटा बसतो जीव
साद नाही, हाक नाही, मग
चाफ्याखालीच निजतो जीव


December 14, 2013

ऐल तटावर, पैल तटावर

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हासते, बोलते, कुढते, डोलते 
नजर तोलते
ऐल तटावर, पैल तटावर 

मनीच्या प्रश्नांची, बोचकी बांधते
वाळूच्या दाण्यांची, गणती मांडते 
थकते, तुटते, अखंड कसते 
दिवस मोजते 
ऐल तटावर, पैल तटावर 

ओलेत्या पानांचे, मार्दव चोखते
कोवळ्या जाणीवा, पोटाशी धरते
जोखते, जपते, लपून हसते
जगून बघते 
ऐल तटावर, पैल तटावर 

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हर्षदा विनया

November 18, 2013

उन्हं

उठून उभं राहावं
आणि दबकत जावं, खिडकीपाशी. 
झिरमिरीत पडदे बाजूला सारून,
चेहरा पुढे करावा. 
मागावे एखाद-दोन सूर्यकिरण, झेलावं थोडं उन. 
बरं वाटतं. 

आपल्या आदिम पूर्वजाला,
या उन्हाने इतकंच बरं वाटलं असेल, तंतोतंत!

व्यवहार, शहाणपण, जबाबदारी, निर्णयक्षमता
कामं, ऑफिस व तत्सम रुक्ष शब्दांना विसरून,
उन्हाचं सुख घ्यावं.

खिडकीपाशी रेंगाळणा-या कुत्र्यालाही , मांजरीलाही,
रोजचे निर्णय रोज घेणा-या मुंग्यांनाही,
या उन्हाने इतकंच बरं वाटत असेल.

आपल्यालाही ह्या उन्हावर जगता यायला हवं,
अगदी तंतोतंत.

हर्षदा विनया

May 27, 2013

रात्री

रात्री नसतात भयाण,

एकट्या,

ह्यांव-त्यांव

किंवा तसलं काही,

रात्री असल्याच, तर असतात फक्त intimate

रात्री सोलतात कातडी आणि उघडी करतात रंध्रे

रात्री पोहचू देतात स्पर्श आत.

रात्री ऐकू देतात आवाज अधिक तीव्रतेने

जाणवू देतात कंपने आवाजातली

डोळ्यांच्या पांढ-या पोकळीत पाहण्याचं देतात धैर्य, रात्री त्यांच्या अंधारात.

रात्री फोडतात बांध

रात्री होऊ देतात मोकळ्या

असल्याच तर, रात्री असतात फक्त intimate

June 6, 2012

मग्न

वाहत्या झ-यातून आरपार,
पाहत राहते एक दगड, मग्नपणे..
पाणी वाहतंय, नितळ-लाल, काळं, निळं..
डोळे आणि दगड, दगड आणि डोळे-
यांना जोडणा-या सरळ रंगहीन रेषेला विच्छेदतात अनेक रंग पाण्याचे.
मी आपली, मग्न जोगिणी सारखी पाहत राहते रंग पाण्याचे.
लाल रंग- ते काळा रंग या आवर्तनात,
घेते अठराशे सत्तावीस श्वास, आणि 'मग्नते' दगडात.
मग्नपणे!

हर्षदा विनया

September 10, 2011

आपण

गर्द काळ्या रात्री, ढगांच्या आडोशातून
अंगावर प्रकाशाचे सडे जपत राहावं.
पाऊसधारा झेलल्या सारखं

डोक्यावरच्या भगभगत्या बल्बचा,
त्या पलीकडे एका मेलेल्या माडीच्या
खिडकीतून येणारा नकोसा लाल प्रकाश,
त्या पलीकडून दूरवरच्या मेणबत्तीचा प्रकाश,
आणि असे बरेच अंधारात उजेडाचे ठिपके
तिथे दूर,चांदण्यांचा प्रकाश
आपल्यासाठीच विखुरालाय असे दाखवणारा

आपण आपले स्तब्ध,
या प्रकाश-प्रकाशातालं अंतर न कळल्यासारखे
सगळंच माझं म्हणून ओढून घेणारे
पाऊसधारा झेलणारे आपण


- हर्षदा विनया

July 6, 2011

...

माझ्या पाखराचा जीव,
ओल्या मातीचं शिवार!
कसा सावरू मिठीत,
कोवळ्या आसवांचा भार?

हर्षदा

February 13, 2011

माती

माती .. 
भुसभूशीत
लुसलुशीत पण अबोल माती
कोणत्यातरी साच्यात
स्वतःला बसवू पाहणारी माती
साचे निराळे, कधी पुरूषी तर कधी स्त्रित्व दाखवणारे..

स्वतःला साच्यात बंद करून,
गुपचूप त्याच्या कूशीत 
निजू पाहणारी माती
साच्याचा नवीन आकार मिळेल,
असे स्वप्नेरी स्वप्न लपवून जगणारी माती..

जिवाच्या आकांताने,
जखमा खात,
साच्यात मावू पाहणारी माती.

धडपड धडपड .. अविश्रांत धडपड..
साच्यात मावण्याची

पण प्रत्येक वेळी,
साचा उपडी केल्यावर
पुर्वीसारखीच भूसभूशीत
खाली कोसळणारी माती.

स्वतःला कोणताच आकार,
न देऊ शकलेली
कोणताही साचा आपला,
न म्हणू शकलेली
थकलेली, विफल माती

हर्षदा विनया

August 2, 2010

तूला

परिघावरचं जग,
त्याची अविरत यात्रा,
मीही आहेच प्रवासी,
तरी शोधते भेदरून
तूला.

चालणारे चालतायंत,
पळणारे पळतायंत,
मी मात्र रांगत राहीलेय,
माझी बाळमूठ मागते..
तूला

कश्या पापण्या मिटतात?
कसे उमलतात डोळे?
कसा येतो आणि हरवतो चंद्र
एक स्वप्न पाहतं
तूला.

हर्षदा

June 2, 2009

तिचं सटवीचं वाण

बाई नाजूक गोजिरी, चवळीची शेंग जशी,
भर भरली अंगानं, बघ मोहरते कशी

अशी काय ती दिवाणी, सांजवेळी फ़िरकली,
नदीकाठी तळ्याकाठी, तिची पावलं रूतली

बाई फ़िरे रानोमाळी, जसं पिसाटलेलं वारं,
तीत नादला तो वेग, मानली वा-यानीही हार

खुळी डोंगर-कपारी, एकलीच गाणी गाते,
फ़ेर धरते हसून, गाभूळली चिंच खाते

बाई वेडी गं वडी गं, वर डोळे वटारते,
मग घाबरून तिला, वर वीज कडाडते

अनवाणी पायांनी, सारं रान धुंडाळते,
काटा बोचला तिला, कि आभाळ पाझरते

बाई वा-याची वा-याची, बाई तशी गं नाठाळ,
अंगाला टोचती नजरा, तरी नाचे बांधूनिया चाळ

बाया बापड्या बघती, घेऊन नजरेत घाण,
तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण

तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण

हर्षदा विनया.

April 1, 2009

आणि बस्स.. आई गं !!

इथून पळ, तिथून पळ,
इथे आपट, तिथे आपट,
एक गुद्दा, एक फ़टका,
एक उडी नि मानेला झटका
धाड धाड, खड खडाट..
धडाम धूम आणि बस्सं.. आई गं !

वेडे वेड , वेडाची लिमीट,
क्रूष्णविवर, चंद्रशेखर लिमिट,
इकडॆ रेषा, तिकडे रेषा
लक्ष्मणरेषा, सगळीकडे लिमिट
आडवा छेद, उभा छेद
ह्या आक्रूत्या, त्या आक्रूत्या
तळ्यात उडी किंवा मळ्यात उडी
धाव धाव पळ पळ.. आणि बस्स.. आई गं !

पडला देह, सावरलं मन,
खरचटला देह, फ़ुत्कारले मन
शरीर थंडावले, किंचाळले मन
वर वर स्तब्ध, निस्तेज देह
आत आत आग आग..आणि बस्स.. आई गं !!

..हर्षदा विनया..

October 9, 2008

चांगले कि वाईट

ती आणि तो, दोघे आताच घरातून बाहेर पडलेयत, बहूतेक "तो" तिला railway-station पर्यंत सोडून मग आपल्या कामाला निघेल.

तो : तूला rikshaw वगैरे नाही का ग बघता येत, दर वेळी मी काय म्हणून हमाली करायची, तुझी?
( ती तरीही शांत, फ़क्त त्याच्या 'हमाली' या शब्दावर जरा रोखून पाहू लागली इतकंच !)
तो : मग काय मला नसते का घाई? बघतेस काय?
ती : घाई, तूला असते, हो का? तरी बरं, सकाळी उठल्यापासून स्वतःची तयारी करण्याव्यतीरीक्त तू काहीही करत नाहीस.सगळे माझ्या डोक्यावर पडतं.
तो : सांगतेस कूणाला? उपकार नाही करत! घरच्या बाईचे कर्तव्यं असते ते..नोकरीला जातात तर स्वतःला शहाण्या समजतात.
ती : अच्छा ! कर्तव्यं माझी, आणि हक्क तूझे का??
तो : ए तू उतर आधी खाली, सकाळी-सकाळी डोके नको खाऊ, रोजची कटकट असते तूझी !! उतर उतर आधी खाली..
( तो गाडी थांबवतो, ती ही नाईलाजाने उतरते, तो पाठ फ़िरवून निघून जातो, मागे न वळता, ती मात्र पाहत असते एकटक त्याच्याकडे..)

थोडे पूढे गेल्यावर त्याच्या bike खाली एक कूत्र्याचे पिल्लू येते, तो तसाच लगबगीने गाडी थांबवतो,ते पिल्लू एका हातात उचलतो आणि तशीच bike मागे वळवून तिच्याकडे येतो)

तो : (अगदी हलक्या आवाजात) हे बघ, कसले लागलेय याला, चल बस आधी bikeवर !
याला hospital मध्ये घेऊन जावूयात

(तो ते पिल्लू तिच्या हातात देतो, ती अवाक !)

तो : अगं, बघतेस काय? बस ना गाडीवर !

(ती बसते.. शांतपणे, तितक्याच शांतपणे, जितक्या शांतपणे खाली उतरली होती, मनातल्या मनात विचार करत राहते, "ह्याला त्या पिल्लाचे दूखणे कळ्ते?,ह्म्मं, त्याच्या अंगातून रक्त आलं ना, म्हणून असेल कदाचित !" ति तशीच स्तब्ध !!)काही वेळाने !!

तो : अगं, आलं ना hospital .. (तो पिल्लला तिच्या हातातून हिसकावून लगबगीने hospital च्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतो, ती मागेच)

ती : अरे मी..

( ती पूढे बोलायच्या आतच तो मागे वळतो )

तॊ : तू का थांबलीये गं, तू जा आपल्या वाटॆ, मी येणार नाहीये तूला सोडायला !!

(ती तशीच तिथून निघून जाते, कूत्र्याच्या पिल्लाचा हेवा करत !)

हर्षदा !!

शून्य !!


काल ट्रेनमधून चालले होते. इतक्या गर्दीच्या ठिकाणी एकटी... खरंच एकटीच... कुणाचे काहीही पडलेले नसलेली मी...

उभी होते दारात, एकटक शून्यात पाहत... जशी जशी ट्रेन पुढे जात होती, तसे तसे माझे नवीन नवीन शून्य निर्माण होत राहिले... माझ्या नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी...

कधी Parle-G ची बिल्डिंग, कधी काही ओळखीच्या दुकानांच्या पाट्या... बस, काहीही माझे शून्य व्यापणारे...

सगळे दिसत असूनही कशाचीही फारशी जाणीव होत नव्हती, कदाचित.

अचानक ट्रेन थांबली... आणि शून्यसुद्धा.

एका पिंपळाच्या झाडावर थांबले शून्य.

पानांची सळसळ...
काळ्याभोर आकाशातले नाजूक थेंब स्वतःच्या पदरात घेणारी पाने...
वाऱ्याशी खेळणारी...
स्वतःकडे ओढून घ्यावे ते झाड...
असे वाटत राहिले...

अचानक पाऊस सुरू झाला...

सगळे थेंब तोंडावर ओघळले...
भिजवले मला...

खूप वेळापासून इतरांशी काहीही देणे-घेणे नसलेली मी, अचानक जागी झाले.

कुणीतरी मोबाइलवर गाणे लावले होते... माझ्या कानांनी ऐकले असावे, माझी परवानगी न घेता... :(

"लग जा गले कि फिर ये हसीं रात हो ना हो,
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो..."

आणि मग, मघापासून पावसाच्या पाण्यापासून माझ्या पापण्यांनी संरक्षण केलेले डोळे स्वतःच ओले झाले...
तेही अचानकच...

आणि मग...
चेहऱ्यावरून वाहणारे पावसाचे पाणी की डोळ्यातले...

आलेला कढ... गाण्यामुळे की मनातला... वारा वेगाने वाहतोय की माझे मन... हे प्रश्न पडत राहिले...

ट्रेन परत सुरू झाली...

पण आता बाहेर पाहायचे नव्हते...
आता 'आत' थोडे वाकून पाहायची गरज होती