September 19, 2011

तरंग...

निवांत स्थिर पाण्यात,
एक दगड भिरकावून
आपण पाहत राहावे त्याकडे
दगडासारखं दगड होऊन..
तरंग.. एक, दोन, तीन, चार..
आणि एकमेकात मिसळलेले,
ते दीड, अडीच, साडेतीन.. तरंग..
एक आणि एक मिळून दिड होणारा तरंग..
'ते' दोन, तीन , चार तरंग
अन 'तो' दीड, 'तो' अडीच, 'तो' साडेतीन तरंग..

- हर्षदा विनया

September 11, 2011

आपण ..

गर्द काळ्या रात्री, ढगांच्या आडोशातून
अंगावर प्रकाशाचे सडे जपत राहावं...
पाऊसधारा झेलल्या सारखं..

डोक्यावरच्या भगभगत्या बल्बचा,
त्या पलीकडे एका मेलेल्या माडीच्या
खिडकीतून येणारा नकोसा लाल प्रकाश,
त्या पलीकडून दूरवरच्या मेणबत्तीचा प्रकाश,
आणि असे बरेच 'अंधारात उजेडाचे' ठिपके..
..
तिथे दूर,चांदण्यांचा प्रकाश..
आपल्यासाठीच विखुरालाय असे दाखवणारा..

आपण आपले स्तब्ध,
या प्रकाश-प्रकाशातालं अंतर न कळल्यासारखे..
सगळंच 'माझं' म्हणून ओढून घेणारे..
पाऊसधारा झेलणारे..
आपण..


- हर्षदा विनया