June 2, 2009

तिचं सटवीचं वाण

बाई नाजूक गोजिरी, चवळीची शेंग जशी,
भर भरली अंगानं, बघ मोहरते कशी..

अशी काय ती दिवाणी, सांजवेळी फ़िरकली,
नदीकाठी तळ्याकाठी, तिची पावलं रूतली..

बाई फ़िरे रानोमाळी, जसं पिसाटलेलं वारं,
तीत नादला तो वेग, मानली वा-यानीही हार..

खुळी डोंगर-कपारी, एकलीच गाणी गाते,
फ़ेर धरते हसून, गाभूळली चिंच खाते..

बाई वेडी गं वडी गं, वर डोळे वटारते,
मग घाबरून तिला, वर वीज कडाडते..

अनवाणी पायांनी, सारं रान धुंडाळते,
काटा बोचला तिला, कि आभाळ पाझरते...

बाई वा-याची वा-याची, बाई तशी गं नाठाळ,
अंगाला टोचती नजरा, तरी नाचे बांधूनिया चाळ...

बाया बापड्या बघती, घेऊन नजरेत घाण,
तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण..

तिला फ़िकीर कुणाची, तिचं सटवीचं वाण...

हर्षदा विनया..

update : बाई म्हणली कि तिच्या चौकटी नकळतंच आखून दिल्या जातात आणि त्या तशाच्या तश्या accept पण केल्या जातात..
मोकळ्या रानात फ़िरणं, काम नसताना घराबाहेर राहणं हे दर दूरंच..पण सहज म्हणून संध्याकाळी फ़ेरफ़टका मारायचं असं तिला वाटलं तरी हजारो माणसं चालत असलेल्या रस्त्यात सुद्धा कोणीतरी सोबत (ओळखीचं) हवं असतं तिला.. कारण तिला तसचं शिकवलेलं असतं....
अशा परिस्थितीमध्ये, एखादी मोकळं राहू पाहणारी मग सटवी ठरते...
माणुस म्हणून सुद्धा साधा हवा असलेला मोकळेपणा सहजासहजी मिळत नाही..
अजूनही गावागावांमध्ये, अफ़गाण, इराण, इराक, बांग्लादेश, भारत (हो आपण सुद्धा) अशा देशांमध्ये आजही बाईचा मोकळेपणा आणि तिचं चरित्र याचा सहज संबंध लावला जातो...

मोकळं फ़िरू पाहणं, निसर्ग अनूभवून पाहणं, स्वतःला आत्ममग्न ठेवणं, या तिच्या गरजा असूच शकत नाहित असं वाटतं या जगात सगळ्यांना... त्यात एखादी "नाठाळ" निघालीच तर तश्याच कडक आणि अश्लील शब्दांमध्ये तिची विभत्सना होते आणि प्रत्येक स्त्री त्या शब्दांना "घाबरते"...
....
म्हणून जर घरात बंदिस्त राहणा-या, खिडकीतून आलेली हवा पुरेशी असणा-या बाईकडे जर सतीचं वाण असेल..तर मी जिला रंगवू पाहतेय अशा बाईकडे सटवीचंच असायला हवं नाही का?
...
या बद्दल तस्लिमा नसरीन यांच्या लेखनमालेतील (नष्ट मेयेर नष्ट गद्य) पहीलाच लेख वाचण्याजोगा आहे..

हर्षदा

ता.क. नष्ट म्हणजे वाया गेलेली.. नष्ट मेयेर नष्ट गद्य म्हणजे नाठाळ बाईचे नाठाळ लिखाण..
तस्लिमा स्वतःला नाठाळ समजते.

कौलारू

कौलारू घर म्हटलं, की सगळाच अंधार...
घराचं छप्पर आणि...
कितीतरी कौलांमध्ये एखादी काच..
काचेतून येणारा एक कवडसा ...
...........प्रकाशाचा...........
त्यातले असंख्य धूलीकण..
उगाच तरंगणारे....

देहाचं घर पण माझ्या..
असंच कौलारू..
बुद्धीच्या छप्पराचे...
बुद्धीच्या छप्परातही अशीच एक काच..
मनाची..
त्यातून येणारा एक कवडसा...

तरंगणारे असंख्य कण...
काही आठवांचे,
काही आसवांचे,
काही मित्रांचे..
काही मित्रांच्या अबोल्याचे...
काही विचारांचे,
काही स्वप्नांचे..
स्वप्नांसाठी झिजलेल्या अंगाचे...

काही उगाच आपले असेच.. नुसते सुन्नतेचे..
..रिकामे रिकामे.....

हर्षदा विनया