August 8, 2016

मागणं

जाई-जुई, केवडा ओला,
गंधाळलेल्या पाकळ्या दोन.
चाखून मकरंद घे अन,
ओळखू बघ येतंय कोण!

हवी हवी, मागते थोडी,
कण्हत किर्र दुपार काळी,
मातीमध्ये रुतलेल्याला,
आभाळाची लागलीये ओढ

देवळापाशी थांब थोडा,
पारावरती थिजून बघ,
गात्रांच्या भरतीखाली,
मृतासाराखा निजून बघ.

खोल खोल, निळी ओळ,
पूर्णविरामाशी उभा सूर्य
उंच उसळून कोसळणा-या 
लाटांची तीक्ष्ण कड 

वारश्यातून गाणं आलंय
सूर इंद्रियांचे जीवघेणे 
अर्थ भाषेला परके,
शब्द-गंधांहाती गेले

उन्हाने झाकून बघ
वाटेवरून परतून चल
चाखून, मापून, स्पर्शून,
ओळखू बघ येतंय कोण!

दुपार

टळटळीत दुपार उघडी गॅलरी लांब पाय, शाॅर्ट शाॅर्टस आभाळात फ्लोटिंग ब्लाॅब ऑफ ऑरेंज
एकटक नजरानजर सरळ चटके डोळयात, चष्म्यातून आरपार हनुवटीला घाम बोटांची हालचाल साचलेल्या धुळीत नक्षीकाम अनबेअरेबल स्लो मोशन एक्झीस्टेंशिअल खड्डा दोन फुट अजून खोल ---पाऊस इंटरस द सिन उघडी गॅलरी बॅगी ग्रे टी-शर्ट नॅचरल सेपिया मोड ऑन नॅचरल नॉस्टॅल्जिया मोड ऑन
कमरेवर हात केस-वारा-भुरभूर ३६० डिग्री शोध- हुरहूर ---टळटळीत दुपार आणि गुळमुळीत पुरुष बोअरडम

- हर्षदा विनया