December 14, 2013

ऐल तटावर, पैल तटावर

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हासते, बोलते, कुढते, डोलते 
नजर तोलते
ऐल तटावर, पैल तटावर 

मनीच्या प्रश्नांची, बोचकी बांधते
वाळूच्या दाण्यांची, गणती मांडते 
थकते, तुटते, अखंड कसते 
दिवस मोजते 
ऐल तटावर, पैल तटावर 

ओलेत्या पानांचे, मार्दव चोखते
कोवळ्या जाणीवा, पोटाशी धरते
जोखते, जपते, लपून हसते
जगून बघते 
ऐल तटावर, पैल तटावर 

पोकळ वा-याची, साद ती ऐकून 
बाहुली धावते
ऐल तटावर, पैल तटावर 

हर्षदा विनया

November 18, 2013

उन्हं

उठून उभं राहावं
आणि दबकत जावं, खिडकीपाशी. 
झिरमिरीत पडदे बाजूला सारून,
चेहरा पुढे करावा. 
मागावे एखाद-दोन सूर्यकिरण, झेलावं थोडं उन. 
बरं वाटतं. 

आपल्या आदिम पूर्वजाला,
या उन्हाने इतकंच बरं वाटलं असेल, तंतोतंत!

व्यवहार, शहाणपण, जबाबदारी, निर्णयक्षमता
कामं, ऑफिस व तत्सम रुक्ष शब्दांना विसरून,
उन्हाचं सुख घ्यावं.

खिडकीपाशी रेंगाळणा-या कुत्र्यालाही , मांजरीलाही,
रोजचे निर्णय रोज घेणा-या मुंग्यांनाही,
या उन्हाने इतकंच बरं वाटत असेल.

आपल्यालाही ह्या उन्हावर जगता यायला हवं,
अगदी तंतोतंत.

हर्षदा विनया

September 2, 2013

मनुची पत्रे - १

हा एक नवीन प्रयोग. लहान मुलांसाठी हि पत्रे लिहिते आहे.१२/०७/२०१३
हाय,
माझं नाव मनू आहे. मी सरस्वती विद्यालयात आहे सहावीत.
मला शाळेतून यायला उशीरच झाला आज. आई ओरडली मला. आल्या आल्या प्रश्नांची बंदुक चालवायला लागली ती. मला इतके रडू येत होते सांगू ..पण तिला काय सांगणार .. म्हणून तुम्हाला पत्र लिहायचे ठरवलं.
परवा सकाळी आमच्या सहावी अ च्या वर्गात एक announcement  झाली. बाल निकेतन, ती मारुतीच्या देवाळाशेजाराची शाळा नाही का?, त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे म्हणे, ग्रुप डान्सची. बाई म्हणाल्या,’ज्यांना घ्यायचाय भाग त्यांनी नावं द्या बघू पटापट’. बाईंचं प..ट..आ ..प..ट असं बोलून होतंय नं होतंय तोच मी पळाले बाकावरून ..
हम्म.. ह्फ्फफ्फ.. मंजिरी, मंजिरी पाटील, बाई”.  बाईंनी माझं नाव हसतच लिहून घेतलं. कसलं काळीज धडधडत होतं माझं. माझ्या तर नजरेसमोर साडी नेसून मिरवणारी मीच यायला लागले. आईचे पैजण मागून घ्यायचे आणि सैल का असेनात घालायचेच, अस ठरवलं मी. मग काल आमची एक मिटिंग झाली. सगळ्यांचा नाच बघितला बाईंनी आणि निवडल्या मुली. ११  जणींना निवडले. आणि माझी निवड झालीच. मी भरतनाट्यम शिकतेय अस सांगितल्यावर बाई कौतुकाने हसल्या. मग आम्ही जोरातच प्रॅक्टीस सुरु केली. मला मस्तच जमत होत्या स्टेप्स. मी डान्स बसवायला पण मदत केली. कुणाला काही जमत नसेल तर बाई मला शिकवायला सांगत होत्या. मला इतके छानंच वाटत होतं. बाईंनी मला मध्ये उभे केले. मी मध्ये अन मागे पाच रांगा दोघीदोघींच्या.
काल रात्री आईला मी सांगितलं, कि तिची ती पिवळी साडी काढून ठेवायला. तुम्हाला माहितीये का, मी रात्री एकटीच गाणं आठवून आठवून आरशात बघून सुद्धा प्रॅक्टीस करत होते. आणि एक गम्मत सांगू, काल मी स्वप्नात डान्सचा दिवस पाहिला. स्वप्नात सगळे कौतुक करत होते माझं.
आज शेवटी दुस-या तासाला आम्हाला डान्स प्रॅक्टीससाठी बोलावलं, एक तास नुसती वाटंच बघत होते मी. मधल्या सुट्टी पर्यंत आम्ही दणकून प्रॅक्टीस केली. मस्तच बसला होता आमचा डान्स. मग प्रिन्सिपल बाईंना बोलावलं गेलं. त्या शेवटची तालीम घेणार होत्या. बाई बसल्या आणि मी मनात प्रार्थना केली. गाणं सुरु झालं. मी नाचायला लागले. आणि नाचतंच राहीले. कधी संपलं ते कळलंच नाही मला. भानावर आले तेव्हा सगळे टाळ्यांच वाजवत होते. नाचाच्या बाईंनी येऊन मिठीच मारली मला. आम्ही सगळ्या जणी गोळा झालो. तेवढ्यात प्रिन्सिपल बाईंनी मला बोलावलं, मला एकदम अभिमान वाटायला लागला. मी समोर जाऊन उभी राहिले. प्रिन्सिपल बाई म्हणाल्या,तू चौथ्या रांगेत डावीकडे रहा हम्म आणि त्या- त्या .. मुलीला येऊ दे पुढे. इतकंच बोलून नजरंच फिरवली त्यांनी माझ्याकडून. मला एकदम थरथरायलाच झालं. घसा कोरडा पडल्यासारखं.
प्रिन्सिपल बाईंनी  मग नाचाच्या बाईंना बोलावले. मी मागे सरकले. त्या नाचाच्या बाईंना सांगत होत्या काहीतरी, मला एकदम समजेनासं झालेलं. पायात गोळे येत होते. अस वाटत होतं, सगळे हसत आहेत मला... एकदम भानावर आल्यासारखं झालं तेव्हा प्रिन्सिपल बाई नाचाच्या बाईंना सांगत होत्या, अगं, वसंतातलं गाणं हे.. पिवळा अगदीच विचित्र दिसेल तिच्या रंगावर
प्रिन्सिपल बाई गेल्या. आमच्या बाईंनी मला मागे उभे केले. आम्ही परत सुरु केलं. माझं सारखं लक्ष माझ्या हाताकडे जात होतं. पिवळा काळ्यावर शोभत नाही का? माझा असा का रंग? मी नाही ठरवला. मी नाही निवडला. रंग मॅलेनीन का कश्यामुळे ठरतो हे प्रिन्सिपल बाईंना माहित नसेल का? असेल माहिती तर का अस वागल्या त्या?
शाळा सुटली. निघाले. रस्त्यात येताना झाडांची पानं हातावर धरून पाहिली. हिरवा-काळा? हिरवा दिसतो चांगला काळ्यावर? आभाळ नीळं. नीळा चांगला कि हिरवा. माती बघितली थोडी लावून. हिरवा, नीळा कि लाल चांगला? जर लाल, हिरवा नि निळा सारखा आहेत, तर काळा इतका वाईट का? का बरं?.... चौकातल्या हँडपंपावर हात धुतले मी किती-कितीदा.
घरी आले तर आई विचारत होती स्वताहूनच, पैंजण हवेत का म्हणून नाचाच्या दिवशी. मी गप्पच बसलेय. मला नको तो डान्स, नकोच तो. नको.
तुमची,
मनू

-- हर्षदा विनया 

May 28, 2013

‘एक’ आणि ‘एक’


‘एक’ आणि ‘एक’ मधल्या, सगळ्याच गणिती प्रक्रिया क्लिष्ट! बेरीज म्हणा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, ह्यांव-त्यांव घात आणि त्याचं respective मूळ. सगळंच समीकरणाच्या व्याख्येत बसवता येणार नाही असंच, डावी बाजू = उजवी बाजू हे निश्चित सांगता येणे अशक्य.
एक आणि एक मिळवला एकत्र, तर ते दोन राहतात? कि एकच होऊन जातात, कि दीड, कि पावणेदोन, कि नुसताच अर्धा.
एकातून वजा केला एक कि शून्य उरतो, कि उरतो एक पूर्ण, कि ‘०-९९%’ एक, कि कधी एखादा एक होतो मोठा, दुसरा एक वजा केल्यावर? एकत्र असतानाचं अपूर्णत्व पूर्ण करतो स्वत:च अस्तित्व नव्याने ओळखून??