October 22, 2008

दिवाळी (???)

दिवाळी जवळ आली नाही का?

मग गेली तिही खरेदीला,
बरेचसे पैसे घेऊन, बरेचसे !!
शिरली एका मोठ्याशा दूकानात,
स्वतःचे कपडे घेता घेता हळूच,
वाकून पाहत होती, पलीकडच्या,
"men's section" मध्ये,
तिथे न्याहाळत होती अधिक तन्मयतेने!
"कोणता रंग उठून दिसेल तूला?,
हा असा shirt आवडेल तूला?"
विचारत राहीली मनातल्या मनात..
शेजरी कूणीही नसताना....

कपड्यांची संपली तशी मिठाई खरेदी..
बघितली चाखून एकेक मिठाई,
गोड मूळी आवडतच नाही तिला,
तरीही सर्वात गोड चव असलेलीच घेतली..
"तूला आवडतं ना गोड फ़ार.."
परत म्हणाली मनातल्या मनात..
शेजरी कूणीही नसताना....

मग दिव्यांची खरेदी,
रांगोळीची,
फ़टाक्यांची,
दागिने.. सगळं स्वतःसाठी,
पण त्याच्या आवडीने,
मनातल्या "त्याला" विचारून !!
शेजारी कूणीच नसताना...

फ़िरत राहीली बाजारात,
प्रचंड गर्दीत, इथून तिथून धक्का घेत.
तरीही बधिर- शरीर आणि मनही..

विकत घेता आला असता सगळा बाजार,
इतके पैसे पर्समध्ये होते तिच्या..
तरी खरेदी अपूर्णंच,
"भंगलेली स्वप्न"फ़ार महाग असतात म्हणे...

हर्षदा (२२ ओक्टो. २००८)

October 14, 2008

ती....

ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली..

ती..

मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती..
ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे ! कधी साधा फ़्रोक, तर कधी जे दिसेल ते गूडांळून बसलेली, माझ्याच वयाची, तिचे नाक मला माझ्यासारखे वाटायंचं, हे तिच्याबद्दलच्या आकर्षणाचे मूख्य कारण.

ती रोज दिसायची, मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे अगदी बराच काळ रोखून बघायचो, मी अगदी तीच्या द्रूष्टीआड होईपर्यंत ती पाहत असायची.

ती काय खात असेल?, काय पित असेल?, तिचे आई बाबा कोण असतील?, शाळेत जात असेल का?, तिला आवडेल का शाळेत जायला? इथपासून ते तिला मासिक पाळी येत असेल का?.. असे अनेक प्रश्न मनात घोंगावायचे माझ्या !!पण कधीच काही विचारलं नाही!
मी रोज शाळॆत, "आज तिला हा प्रश्न विचारायचा" असे ठरवून यायचे.कधी छानसा पदार्थ डब्यात असला की थोडा राखून ठेवायचे,जसे मैदान जवळ येइल तसे डबा काधून हातात घ्यायचे, पण तिच्यासमोर कधी उघडलाच नाही !! कधी मान वळवून तिच्याकडे पाहून हसलेही नाही.

असा खेळ सतत तीन वर्ष चालला.. मी आठवी ते दहावीत जाईपर्यंत !! मग शाळा सूटली आणि तो मार्ग सुदधा !
मध्ये तीन वर्ष लोटली !!

एक दिवशी अचानक PACE मधून घरी येताना ती दिसली, अरे हो! तीच होती, पण आता तिने फ़्रोक घातला नव्हता, एक लांबच्या लांब कपडा साडीसारखा गूंडाळला होता, तिच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून आणि तिच्या कमरेवरच्या शेंबड्या, आणि नागड्या पोरावरून मला काय तो अंदाज आला...

तीने ही मला ओळखले, आणि त्या दिवशी इतक्या वर्षात पहील्यांदा हसली !!

आमचा बराच काळ शब्दांवीना संवाद चालला होता.. माझा व्याकूळ चेहरा बहूतेक तिला विचारत होता,"तू?, इथे कशी?,ते मैदान सोडले?, लग्न झाले तूझे?, ती मूलं तूझीच का गं?" तिचा चेहरा मात्र काहीच बोलत नव्हता !!

तेवढ्यात मागून एक पोरकट पण दारू पिऊन अंग सूजलेला एक माणूस (कि मूलगा) आला. त्याने जोरात तिच्या पाठीत एक धपाटा टाकला, ती कळवळली आणि मी ही!!

ती रागाने त्याच्याकडे बघू लागली तर त्याने जोरात तीला पूढे ढकलून, "इथे काय थांबलि? पूढे चल !" असे सूचवले.

ती गेली, आज ती माझ्याकडे मी जाइपर्यंत पाहत नव्हती, आज ते मी करत होते !!

कूठे असेल ती आता? असेल कि नसेल? किती मूलं असतिल एव्हाना तिला? आणि तो तिचा नवरा (कि अजून कोणी) त्रास देत असेल तिला? तीला येत असेल माझी आठवण? मी इथे तिच्याबद्दल सगळ्यांना सांगतेय,हे तिला कळले तर ती काय म्हणेल?

हर्षदा...

October 11, 2008

माणूस नावाचे कोडं,,,,

एकदा घामाने तरबतर झालेली, पाठीवर मोठी bag (दिवसभराचे दोन डबे, physics आणि chemistry चं journal, 6/7 वह्या,आणि नेमके त्या दिवशी विकत घेतलेले "halliday and resnick"चं पूस्तक) , आणि हातात दोन फ़ाईलवजा electronics journals सावरत एक मूलगी दादरला चर्चगेटवरून येणा-या विरार लोकलमध्ये धडपडत पहील्या वर्गाच्या महीला डब्यात संध्याकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान चढते.

ती स्वतःचा तोल सावरत सावरत आत येईस्तोवर तिची नजर इकडेतिकडे चटकन भिरभिरते.. एखादी चौथी seat तरी मिळते का म्हणून (फ़ोल आशा , जिथे चौथ्याseat जवळ पण उभे राहायला जागा नाही तिथे बसायला??)! ती आता व्यवस्थित त्या डब्यात तोल सावरून उभी राहते, परत इकडे-तिकडे नजर फ़िरवते bandraला तरी कूणी ऊठेल या आशेने!
मग आत येउन दोन समोरासमोरच्या seatsमधल्या जागेत खिडकीपासून तिसरी उभी राहते आणि "Can i keep my bag on that rack?" अशी शेजारच्या बाईला विनंती करते. ( तिला बहूतेक, "मला bag ठेवायची आहे तेव्हा आपापली धूडं घेऊन क्रूपया बाजूला व्हा, असे सूचवायचे असणार")
तिच्या या धडपडीत चूकून एका ऐसपैस बसलेल्या बाईला पाय लागतो, ती "ऐसपैस बसलेली हीच्याकडे बघू लागते" आणि आजूबाजूच्या गर्दीतून, आपल्याला किती त्रास होतोय अशा अर्थाचे "चं, चं,these college students don't have manners" उद्गार बाहेर पडतात, ती अजूनच ओशाळ्ते, पाठीवरचं ओझं नकोसं होते तीला!!

एवढ्यात तिच्या लक्षात येते, कि जिला आपला पाय लागला होता, ती मात्र आपल्याकडे टक लावून बघतेय, पापणीही न हलवता ! आता हीला अजूनच राग आला, मनातल्या मनात म्हणू लागली "काय बाई आहे, एकतर हीच्यामूळे ही bag अशीच पाठीवर रूळतेय अजून, आणि आता माझंच काही चूकल्यासारखे वटारून पाहतेय, जरा हसं आहे की नाही हीच्या तोंडावर?, हीला नसतील मूलं? कशी बघतेय हि... "

तेवढ्यात, एक कूणितरी आकाराने प्रचंड असलेली बाई आत येऊन seats विषयी चौकशी करायला लागली. "जीला पाय लागला होता" तिला विचारलं असता मान हिच्याकडून न वळवता हातानेच दोन बोटं हलवून नाही सांगितले, बोलायची पण इच्छा नाही !!

आता तर हिला अजूनच राग आला,मनात परत सूरू,( काहीतरी सांताक्रूझ आले होते तेव्हा, खिडकीतून दिसले)
" काय रे बाबा, म्हणावं या बाईला, अशी का पाहतेय?, हिला काय एवढे गमतीशीर दिसंलं माझ्यात? अगं बाई, काकू, मावशी, मामी, जी कूणी असशील जरा दूसरीकडे बघना! इथे काय?, त्यात चेह-यावर हसू नाहीये तूझ्या! मला हे आवडत नाहीये हे पण लक्षात येऊ नये का गं"..
आता तर हिच्या मनात भलत्याच शंका यायला लागल्या, लागोलाग तिने शर्टाची बटणं तपासली, मग pantची झिप, केस, चेहरा.. काहीच "problem" नाही, मग का बघतेय ही इथे?

हा खेळ असाच चालू राहीला, तिचे बघणे आणि हीचे धूसफ़ूसणे!

अंधेरी आले, ती उठली आणि हीलाच हाताच्या इशा-याने इथे बस म्हणून सांगितले, ती बसली, बरं वाटलं, "thanks" वगैरे काही पण म्हणाली नाही.
ती बाहेर जाऊन उभी राहीली, आणि मग गर्दीत हरवली, हिलाही आता तिची चिंता कशाला?, स्वतःला आयतं बसायला मिळालं!

उतरायची वेळ आली, तेव्हा हि आपले सारे सामान (तेच सगळें) उचलून बाहेर आली तर अवाक, ती बाई तिथेच उभी होती..
अरे !! हि अवाक!!

तिला उतरायचे नव्हते तर ती का उठली जागेवरून अर्ध्या तासापूर्वी? काय म्हणून, आणि अजून उतरलीच नाही, बरं उठायचं होते तर, ती आलेली प्रचंड बाई, तिला का नाहि सांगितले उतरायचंय ते? का नाही, आता इथेच का थांबली असेल, मलाच का दिले बसायला?? एक ना अनेक प्रश्न !!

जाउदे ! असे म्हणून जेव्हा ही station वर उतरायला जाणार तेव्हा मागून हळूच ती आली आणि तिने हीच्या डोक्यावरून हात फ़िरवला, अगदी मायेने, पण तरीही ती हसली नाही,.....हसता येतंच नाहि अशी ती..

आता ही पण खाली उतरली, ती अजूनही train मध्ये होती, ती उतरलीच नाही, म्हणजे तिला आपल्यापेक्षाही पूढच्या station वर उतरायचंय तर!
मग ती का उठली? न हसता कशी जगत असेल ही, हात का फ़िरवला माझ्याच डोक्यावरून, असे प्रश्न स्वतःला विचारत तिने rikshaw पकडली.. आणि ती ्न हसणारी हिच्या तोडांवर एक हास्याची लकेर उमटवून गेली, कायमची.....

हर्षदा !!

ता.क. ती तिला वाईट म्हणणारी "हि" मीच होते, माणसं न ओळखता येणारी मी!

October 10, 2008

चांगले कि वाईट

ती आणि तो, दोघे आताच घरातून बाहेर पडलेयत, बहूतेक "तो" तिला railway-station पर्यंत सोडून मग आपल्या कामाला निघेल.

तो : तूला rikshaw वगैरे नाही का ग बघता येत, दर वेळी मी काय म्हणून हमाली करायची, तुझी?
( ती तरीही शांत, फ़क्त त्याच्या 'हमाली' या शब्दावर जरा रोखून पाहू लागली इतकंच !)
तो : मग काय मला नसते का घाई? बघतेस काय?
ती : घाई, तूला असते, हो का? तरी बरं, सकाळी उठल्यापासून स्वतःची तयारी करण्याव्यतीरीक्त तू काहीही करत नाहीस.सगळे माझ्या डोक्यावर पडतं.
तो : सांगतेस कूणाला? उपकार नाही करत! घरच्या बाईचे कर्तव्यं असते ते..नोकरीला जातात तर स्वतःला शहाण्या समजतात.
ती : अच्छा ! कर्तव्यं माझी, आणि हक्क तूझे का??
तो : ए तू उतर आधी खाली, सकाळी-सकाळी डोके नको खाऊ, रोजची कटकट असते तूझी !! उतर उतर आधी खाली..
( तो गाडी थांबवतो, ती ही नाईलाजाने उतरते, तो पाठ फ़िरवून निघून जातो, मागे न वळता, ती मात्र पाहत असते एकटक त्याच्याकडे..)

थोडे पूढे गेल्यावर त्याच्या bike खाली एक कूत्र्याचे पिल्लू येते, तो तसाच लगबगीने गाडी थांबवतो,ते पिल्लू एका हातात उचलतो आणि तशीच bike मागे वळवून तिच्याकडे येतो)

तो : (अगदी हलक्या आवाजात) हे बघ, कसले लागलेय याला, चल बस आधी bikeवर !
याला hospital मध्ये घेऊन जावूयात

(तो ते पिल्लू तिच्या हातात देतो, ती अवाक !)

तो : अगं, बघतेस काय? बस ना गाडीवर !

(ती बसते.. शांतपणे, तितक्याच शांतपणे, जितक्या शांतपणे खाली उतरली होती, मनातल्या मनात विचार करत राहते, "ह्याला त्या पिल्लाचे दूखणे कळ्ते?,ह्म्मं, त्याच्या अंगातून रक्त आलं ना, म्हणून असेल कदाचित !" ति तशीच स्तब्ध !!)काही वेळाने !!

तो : अगं, आलं ना hospital .. (तो पिल्लला तिच्या हातातून हिसकावून लगबगीने hospital च्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतो, ती मागेच)

ती : अरे मी..

( ती पूढे बोलायच्या आतच तो मागे वळतो )

तॊ : तू का थांबलीये गं, तू जा आपल्या वाटॆ, मी येणार नाहीये तूला सोडायला !!

(ती तशीच तिथून निघून जाते, कूत्र्याच्या पिल्लाचा हेवा करत !)

हर्षदा !!

कूणी कूणाला चांगले का म्हणावे आणि वाईटही का म्हणावं? हा माझ्या मलाच पडलेला एक मोठा आणि मी समाधानकारक उत्तर न देऊ शकलेला प्रश्न !!!...

शून्य !!

काल ट्रेन मधून चालले होते, इतक्या गर्दीच्या ठीकाणी एकटी..... खरच एकटीच... कुणाचे काहीही पडलेले नसलेली मी....
उभी होते दारात एकटक शून्यात पाहत... जशी जशी ट्रेन पुढे जात होती तसे तसे माझे नवीन नवीन शून्य निर्माण होत राहीले... माझ्या नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी॥
कधी parle-g ची building, कधी काही ओळखीच्या दूकानांच्या पाट्या........ बस काहीही माझे शून्य व्यापणारे.....
सगळे दिसत असून कशाचीही फ़ारशी जाणीव होत ्नव्हती ्कदाचित
अचानक ट्रेन थांबली ....... आणी शून्य सुद्धा .....
..............
एका पींपळाच्या झाडावर थांबले शून्य
पानाची सळसळ ...
काळ्याभोर आकाशातले नाजुक थेंब ्स्वतःच्या पदरात घेणारी पाने ....
वा-याशी खेळणारी......
स्वताकडे ओढून घ्यावे ते झाड़ ......
असे वाटत राहीले... अचानक पाऊस सूरू झाला... ...
सगळे थेंब तोंडावर ओझरले.....
भीजवले मला ......

खूप वेळापासून इतरांशी काहीही देणे- घेणे नसलेली मी, अचानक जागी झाले॥
कूणीतरी मोबाइल वर गाणे लावले होते.... माझ्या कानांनी ऐकले असावे माझी परवानगी न घेता.... :(

"लग जा गले की फीर ये , हसीं रात हो ना हो
शायद फीर इस जनम में , मुलाकात हो ना हो॥"

आणी मग मघापासून पावसाच्या पाण्यापासून माझ्या पापण्यांनी संरषण केलेले डोळे स्वतःच ओले झाले
तेही अचानकच.....

आणी मग...
चेह-या वरून वाहणारे पावसाचे पाणी की डोळ्यातले

आलेला कढ.... गाण्यामूळे की मनातला, वारा वेगाने वाहतोय की माझे मन ........... हे प्रश्न पडत राहीले....
ट्रेन परत सूरू झाली॥
पण आता बाहेर पहायचे नव्हते...
आता 'आत' थोड़े वाकून पहायची गरज होती................