August 8, 2016

मागणं

जाई-जुई, केवडा ओला,
गंधाळलेल्या पाकळ्या दोन.
चाखून मकरंद घे अन,
ओळखू बघ येतंय कोण!

हवी हवी, मागते थोडी,
कण्हत किर्र दुपार काळी,
मातीमध्ये रुतलेल्याला,
आभाळाची लागलीये ओढ

देवळापाशी थांब थोडा,
पारावरती थिजून बघ,
गात्रांच्या भरतीखाली,
मृतासाराखा निजून बघ.

खोल खोल, निळी ओळ,
पूर्णविरामाशी उभा सूर्य
उंच उसळून कोसळणा-या 
लाटांची तीक्ष्ण कड 

वारश्यातून गाणं आलंय
सूर इंद्रियांचे जीवघेणे 
अर्थ भाषेला परके,
शब्द-गंधांहाती गेले

उन्हाने झाकून बघ
वाटेवरून परतून चल
चाखून, मापून, स्पर्शून,
ओळखू बघ येतंय कोण!

No comments: