September 9, 2015

.

हो,
सरकव तो पडदा,
अरे, हां, बस!
पूर्ण नको.


त्या पालिकडल्या स्ट्रीट लाईटच्या
पिवळसर प्रकाशाची
ही धगधगती किनार असू दे तशीच,
पडद्याच्या लाटांवर!
आणि तू तिथेच उभा राहा.
स्तब्ध.

इथे या उशीवर मात्र,
पसरुन देणार आहे मी,
माझे चांदण्या माळलेले केस
आणि गुंफवून धरणार आहे,
माझीच बोटं एकमेंकात.
गालिच्यावर रेखाटलेल्या वेलीवर,
ठसवुन देणार आहे मी,
माझ्याच श्वासांची फुलं.
आज!

डोळे मिटले
की म्हणतात
पार करता येतात सगळी अंतरं.

मी ही माझ्या मिटलेल्या पापण्यांमागे,
पार करणार आहे,
तू सांगितलेल्या सगळ्या अशक्यतेच्या मर्यादा,
आज तुझ्याच साक्षिने.

तू धरून ठेव पडदा नीट...


हर्षदा विनया

No comments: