September 30, 2015

मुलगी वेचते फूलं...

मुलगी वेचते फूलं...


मुलगी
अरूणोद्याआधीच उमलवते डोळे,
निघते दाराबाहेर,
चालून बघते वाटा,
ओळखीच्या अन अनोळखी...
प्रत्येक वाटेवर वेचुन घेते एकेक फूल,
आणि खोचुन घेते कंबरेशी.

सूर्य माथ्यावर येईस्तोवर
मूलीने रचलेला असतो बगीचा
कंबरेच्या परिघावर

सगळी फुलं नादावत असतात,
तिच्या प्रत्येक पावलागणिक
जणू झालियेत घुँगरू

रंगीबेरंगी फुलं घेऊन मग मुलगी निघते क्षितिजाकडे
पश्चिमेकडच्या टेकड़ीवर
पाठमोरा बसलेला तो,
ओळखून येत असतो तिला
दुरुनंच
ती चालु लागते त्याच्या दिशेने
सूर्याचा मागोवा घेत

मुलगी बागड़ते वाटेवर
आणि गंधाळते वाटा,
एकूणएक
.
.
टेकड़ीपाशी पोहोचली की मात्र
मुलगी घेते
सगळी फुलं ओंजळीत
लपवते पाठीमागे
साद घालते त्याला
तो वळून पाहीपर्यंत
मुलगी मनातल्या मनात
मांडते गणितं फुलांची...
मांडते त्यांचे क्रम,
त्याच्या आवडीनिवडीला साजेसे
मुलगी वाट बघते
.
.
मुलगी मुलाला पाहुन बावरते
मुलगी ओठ घट्ट दाबून धरते
आणि मुलगी मुलाची स्थिर नजर पाहुन ओशाळते
.
.
मावळत्या सूर्याच्या रंगाकडे बघुन हसत,
मग
शरीरामागच्या अंधारात
मुलगी सांडून देते,
एकेक फूल
ओंजळ रिकामी होइस्तोवर
मुलगी परतते
मुलगी म्हणे नित्य क्रमाने फूलं वेचते
...


हर्षदा विनया

No comments: